जी-20 सदस्यत्वासाठी द.आफ्रिका अयोग्य
डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य : श्वेतवर्णीय शेतकऱ्यांवर अत्याचार होतोय
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी मियामी येथे होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी दक्षिण आफ्रिका या देशाला आमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 सालातील ही जी-20 शिखर परिषद ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे. दक्षिण आफ्रिका हा देश कुठल्याही प्रकारे जी-20 च्या सदस्यत्वासाठी योग्य नसल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. अलिकडेच दक्षिण आफ्रिकेत जी-20 ची शिखर परिषद पार पडली आहे. या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सामील झाले नव्हते. आता अमेरिका दक्षिण आफ्रिकेकडून जी-20 चे अध्यक्षत्व स्वीकारणार आहे. 1 डिसेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत अमेरिका जी-20 समुहाचे अध्यक्षत्व सांभाळणार आहे. दक्षिण आफ्रिकन सरकार आफ्रिकन लोक आणि डच, फ्रेंच आणि जर्मन सेटलर्सच्या वंशजांवर होत असलेल्या अत्याचारांवर लक्ष देण्यास नकार देत असल्याने अमेरिकेने तेथील जी-20 परिषदेत भाग घेतला नव्हता.
आपण कुठल्याही प्रकारे सदस्यत्वासाठी पात्र नसल्याचे दक्षिण आफ्रिकेने जगाला दाखवून दिले आणि आम्ही त्यांना देण्यात येणारा सर्व निधी आणि अनुदान त्वरित रोखू, असे ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेने जी-20चे अध्यक्षत्व आमच्या अमेरिकन दूतावासाच्या एका वरिष्ठ प्रतिनिधीला सोपविण्यास नकार दिला. हा प्रतिनिधी परिषदेच्या समारोप सोहळ्यात सामील झाला होता. याचमुळे आता दक्षिण आफ्रिकेला पुढील वर्षी होणाऱ्या जी-20 परिषदेचे आमंत्रण मिळणार नाही. ही परिषद फ्लोरिडाच्या मियामी शहरात आयोजित होणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच जी-20 शिखर परिषद 22-23 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ट्रम्प यांनी यात सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णीय लोकांची हत्या केली जात असून त्यांची शेतजमीन हिसकावून घेतली जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.