दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये
पहिल्या कसोटीत पाकिस्तानवर मात
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिका 2025 जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानन आफ्रिकेसमोर 148 धावांचे छोटे लक्ष्य ठेवले होते. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेलाही संघर्ष करावा लागला. एडन मार्करम आणि रबाडा-यान्सन जोडीने शानदार खेळी साकारत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. उभय संघातील दुसरा सामना दि. 3 जानेवारी पासून केपटाऊन येथे खेळवण्यात येईल.
सुपरस्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात 211 तर दुसऱ्या डावात 237 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 301 धावा आणि दुसऱ्या डावात 150 धावा करत सामना जिंकला. वेगवान गोलंदाजांना विकेटवरून मिळत असलेल्या मदतीमुळे यजमानांना माफक लक्ष्यही गाठतानाही संघर्ष करावा लागला. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने एकेकाळी 99 धावांत आठ विकेट गमावल्या होत्या. मात्र, शेवटी मार्को यान्सेन (24 चेंडूत 16 धावा) आणि कागिसो रबाडा (26 चेंडूत 31 धावा) यांनी नवव्या विकेटसाठी 50 चेंडूत 51 धावांची नाबाद भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या शानदार विजयासह आफ्रिकेने आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर 2-0 अशी मालिका जिंकल्यानंतर प्रोटीज संघ आधीच डब्ल्यूटीसी गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. सध्याच्या हंगामात 11 कसोटी खेळलेल्या दक्षिण आफ्रिकेकडे 7 विजयांसह 66.67 टक्के पीसीटी आहे. आता संपूर्ण क्रिकेटविश्वाला दुसरा फायनलिस्ट कोण असणार, याची उत्सुकता लागली आहे.