ऑस्ट्रेलियाला हरवून द. आफ्रिका अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/दुबई
‘सामनावीर’ अॅनेक बॉशच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात द. आफ्रिकेने विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाचा 16 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. बॉशने 48 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 74 धावा फटकावताना कर्णधार वूलव्हार्टसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 96 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली आहे.
या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 बाद 134 धावा जमविल्या. त्यानंतर द. आफ्रिकेने 17.2 षटकात 2 बाद 135 धावा जमवित या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला जेतेपद स्वत:कडे राखता आले नाही. आता विंडीज व न्यूझीलंड यांच्यात दुसरा उपांत्यफेरीचा सामना होणार असून या सामन्यातील विजयी संघाबरोबर द. आफ्रिकेची जेतेपदासाठी लढत होईल. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये बेथ मुनीने 42 चेंडूत 2 चौकारांसह 44, कर्णधार मॅकग्राने 33 चेंडूत 3 चौकारांसह 27, एलीस पेरीने 23 चेंडूत 2 चौकारांसह 31, लिचफिल्डने 9 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 16, हॅरिसने 3 तर वेअरहॅमने 5 धावा जमविल्या. द. आफ्रिकेतर्फे आयाबोंगा खाकाने 24 धावांत 2 तर कॅप आणि म्लाबा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या डावात 11 चौकार नोंदविले गेले.
ऑस्ट्रेलियाने पॉवरप्लेच्या 6 षटकात 35 धावा जमविताना 2 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 59 चेंडूत तर शतक 101 चेंडूत फलकावर लागले. ऑस्ट्रेलियाने 10 षटकाखेर 2 बाद 53 धावा जमविल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेची कर्णधार वूलव्हार्ट आणि ब्रिटस् यांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजी केली. डावातील पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या सदरलॅन्डने ब्रिटस्चा त्रिफळा उडविला. तिने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविताना वूलव्हार्टसमवेत पहिल्या गड्यासाठी 25 चेंडूत 25 धावांची भागिदारी केली.
बॉशचे मैदानात आगमन झाल्यानंतर वूलव्हार्टने तिला फलंदाजीची अधिक संधी दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 10.5 षटकात 96 धावांची भागिदारी केली. वूलव्हार्टने 37 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 42 धावा जमविल्या. 15 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सदरलॅन्डने तिला झेलबाद केले. द. आफ्रिकेला यावेळी विजयासाठी 14 धावांची जरुरी होती. बॉश आणि ट्रायोन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. बॉशने 48 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 74 धावा झळकविल्या. ट्रायोन 1 धावेवर नाबाद राहिली. द. आफ्रिकेच्या डावात 3 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे सदरलॅन्डने 26 धावांत 2 गडी बाद केले. द. आफ्रिकेने पॉवरप्लेच्या 6 षटकात 43 धावा जमविताना 1 गडी गमविला. 10 षटकाअखेर द. आफ्रिकेने 1 बाद 74 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकात 5 बाद 134- (मुनी 44, मॅकग्रा 27, पेरी 31, लिचफिल्ड नाबाद 16, हॅरिस 3, वेअरहॅम 5, अवांतर 8, खाका 2-24, कॅप 1-24, म्लाबा 1-31), द. आफ्रिका 17.2 षटकात 2 बाद 135 -(बॉश नाबाद 74, वूलव्हार्ट 42, ब्रिटस् 15, ट्रायोन नाबाद 1, अवांतर 3, सदरलॅन्ड 2-26)