दक्षिण आफ्रिका ‘चॅम्पियन’
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय : अॅडम मॅरक्रम सामनावीर
वृत्तसंस्था/ लंडन
ज्यांनी त्यांच्या क्रिकेट प्रवासात अनेकदा अंतिम टप्प्यावर येऊन हार पत्करली, त्याच दक्षिण आफ्रिकेने अखेर इतिहास रचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवत 27 वर्षांचा ‘चोकर्स’ टॅग पुसून टाकला आणि आयसीसी ट्रॉफीवर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत 5 गडी राखून पराभव केला. यासह 1998 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत विजय न मिळवू शकलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. नाबाद शतकी खेळी साकारणाऱ्या अॅडम मॅरक्रमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात ब्यू वेबस्टरने सर्वाधिक 72 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी तर डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनने तीन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 212 धावांवर आटोपला. पहिल्या डावात आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरीही निराशाजनक राहिली, परिणामी, संपूर्ण आफ्रिकन संघ 138 धावांवर ऑलआउट झाला. डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक 45 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा विकेट घेतल्य। यामुळे पहिल्या डावात कांगारुंन 74 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात खेळताना कांगारुंची घसरगुंडी उडाली. एकवेळ त्यांची 7 बाद 73 अशी बिकट स्थिती होती. येथून, यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स केरी आणि मिचेल स्टार्क यांच्या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ 207 धावांपर्यंत पोहोचू शकला. स्टार्कने 136 चेंडूत 58 धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडानेही दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्या. तर लुंगी एनगिडीने तीन यश मिळवले. पहिल्या डावातील आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचे लक्ष्य दिले.
मॅरक्रमचे शतक तर बवुमाची संयमी खेळी
लॉर्ड्सच्या मैदानावर आफ्रिकेला विजयासाठी 282 ही धावसंख्या खूप मोठी होती. पण एडन मॅरक्रमचे शतक आणि जखमी असूनही कर्णधार तेंबा बावूमाने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव उचलून धरला. आफ्रिकेला विजयासाठी 6 धावांची गरज असताना मॅरक्रम झेलबाद झाला. सलामीला उतरलेल्या या स्टार फलंदाजाने 207 चेंडूत 14 चौकारांसह 136 धावांची मॅचविनिंग खेळी केली. तर काईली वेरेनला संघाला एका धावेची गरज असताना चौकार लगावत संघाची आयसीसी ट्रॉफी विजयाची वर्षानुवर्षांची प्रतिक्षा संपवली. याशिवाय, कर्णधार बवुमाने 55 चौकारासह 66 धावांची खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. बेडिंगहॅम 21 धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने विजयी लक्ष्य 83.4 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाकडून स्टाकने 3 तर कमिन्सने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 212 व दुसरा डाव 207
दक्षिण आफ्रिका पहिला डाव 138 व दुसरा डाव 83.4 षटकांत 5 बाद 282 (मॅरक्रम 14 चौकारासह 136, मुल्डर 27, टेंबा बवुमा 66, बेडिंगहॅम नाबाद 21, वेरियन नाबाद 4, स्टार्क 3 तर कमिन्स 1 बळी).
विजेतेपदानंतर आफ्रिकेवर पैशांचा पाऊस
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सुमारे 30.7 कोटी रुपये (3.6 दशलक्ष डॉलर्स) बक्षीस मिळाले. तसेच उपजेतया संघाला सुमारे 18.53 कोटी रुपये (2.16 दशलक्ष डॉलर्स) मिळाले. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. टीम इंडियाला 1.44 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 12.30 कोटी रुपये मिळाले. याशिवाय, चौथ्या क्रमाकांवर राहिलेल्या न्यूझीलंडला 10.35 कोटी रुपये मिळाले आहेत. पाचव्या क्रमाकांवरील इंग्लंडला 8.28 कोटी, सहाव्या क्रमांकावरील लंकेला 7.28 कोटींचे बक्षीस मिळाले.
आयसीसीला मिळाला नवा चॅम्पियन
दक्षिण आफ्रिकेने क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. 1998 मध्ये त्यांनी क्रिकेट इतिहासातील पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली होती, आणि आता बवुमाच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. 1998 नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिका आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा आनंद साजरा करत आहे, ज्यामुळे त्यांच्या क्रिकेटच्या प्रवासाला नवीन उंची मिळाली आहे. बवुमाच्या कर्णधारपदाखाली संघाने तब्बल 27 वर्षानंतर जबरदस्त प्रदर्शन करत, आयसीसी स्पर्धेत आपली ताकद सिद्ध केली आहे. हा विजय केवळ संघासाठी नाही तर संपूर्ण दक्षिण आफ्रिकन क्रिकेटसाठी अभिमानाची बाब आहे.
आफ्रिकेचा जोरदार जल्लोष, बवुमाचे गनशॉट सेलिब्रेशन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आफ्रिकन कर्णधार बवुमाचे ‘गनशॉट‘ सेलिब्रेशन विशेष लक्ष वेधून घेत आहे. ट्रॉफी खांद्यावर घेऊन त्यांनी फायरिंग करत विजयाचा जल्लोष साजरा केला. हा खास सेलिब्रेशन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने केवळ या विश्व टेस्ट चॅम्पियनशिपचा इतिहासच बदलला नाही, तर त्यांचा संघ आणि देश एकत्र येऊन या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली चमकला. सामन्याच्या चौथ्या दिवशी काइल व्हेरेनच्या बॅटमधून विजयाची धाव येताच, लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममधील दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ तसेच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्याने आणि सामान्य क्रिकेट चाहत्यानेही आनंदाने उड्या मारल्या.
गेले काही दिवस खूपच खास होते. काही क्षणांसाठी तर वाटले की आम्ही दक्षिण आफ्रिकेतच आहोत. आम्ही खूप मेहनत घेतली होती आणि पूर्ण विश्वासाने येथे आलो होतो. हा क्षण आमच्यासह देशातील लोकांसाठी खूप खास आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील ह जेतेपद निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
टेंबा बवुमा, दक्षिण आफ्रिकन कर्णधार

दुर्दैवाने आमच्यासाठी हा सामना थोडा अवघड होता. काही गोष्टी आमच्या बाजूने होत्या, आम्हाला पहिल्या डावात चांगली आघाडी मिळाली होती, पण त्यांना आम्ही चौथ्या डावात बाद करू शकलो नाही. ‘पण गेली दोन वर्षे शानदार होती. या सामन्यात सर्वकाही जुळून आले नाही. एकाक्षणी खेळपट्टी सपाट वाटली होती, पण येथे परिस्थिती झपाट्याने बदलते. आमच्यासाठी दुर्दैवाने तसे घडले नाही.
पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियन कर्णधार.