द.आफ्रिकेचा विंडीजवर 10 गड्यांनी विजय
महिला टी-20 वर्ल्ड कप : म्लाबा ‘सामनावीर’, वूलव्हार्ट-ब्रिट्स यांची नाबाद अर्धशतकांसह अभेद्य शतकी भागीदारी
वृत्तसंस्था / दुबई
2024 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत द. आफ्रिका महिला संघाने आपल्या मोहिमेला विजयी प्रारंभ करताना शुक्रवारच्या सामन्यात विंडीजचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. 29 धावांत 4 गडी बाद करणाऱ्या म्लाबाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर विंडीजने 20 षटकात 6 बाद 118 धावांपर्यंत मजल मारत द. आफ्रिकेला 119 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर द. आफ्रिकेने 17.5 षटकात बिनबाद 119 धावा जमवित हा सामना 10 गड्यांनी सहज जिंकला.
विंडीजच्या डावात स्टिफेनी टेलरने एकाकी लढत देत 41 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 44, कर्णधार मॅथ्युजने 11 चेंडूत 2 चौकारांसह 10, जोसेफ 1 चौकारासह 4, डॉटीनने 11 चेंडूत 3 चौकारांसह 13, कॅम्पबेलने 21 चेंडूत 1 चौकारांसह 17, जेम्सने 13 चेंडूत 2 चौकारांसह 15, अॅलेनीने 8 चेंडूत 7 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 1 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे नॉनकुलुलेको म्लाबाने 29 धावांत 4 तर कॅपने 14 धावांत 2 गडी बाद केले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 31 धावा जमविताना 2 गडी गमविले. विंडीजचे अर्धशतक 52 चेंडूत, शतक 104 चेंडूत फलकावर लागले. विंडीजने 10 षटकाअखेर 3 बाद 57 धावा जमविल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार लॉरा वूलव्हार्ट आणि ब्रिट्स यांनी 17.5 षटकात अभेद्य 119 धावांची शतकी भागिदारी करुन आपल्या संघाला हा सामना 13 चेंडू बाकी ठेवून 10 गड्यांनी जिंकून दिला. वूलव्हार्टने 55 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 59 तर ब्रिट्सने 52 चेंडूत 6 चौकारांसह 57 धावा झळकविल्या. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 43 धावा जमविल्या. द. आफ्रिकेचे अर्धशतक 41 चेंडूत तर शतक 85 चेंडूत नोंदविले गेले. ब्रिट्सने 45 चेंडूत 5 चौकारांसह तर वूलव्हार्टने 45 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले. द. आफ्रिकेच्या डावात 13 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकात 6 बाद 118 (टेलर नाबाद 44, कॅम्पबेल 17, डॉटीन 13, मॅथ्युज 10, जेम्स नाबाद 15, अवांतर 8, म्लाबा 4-29, कॅप 2-14), द. आफ्रिका 17.5 षटकात बिनबाद 119 (वूलव्हार्ट नाबाद 59, तझमिन ब्रिट्स नाबाद 57, अवांतर 3).