द.आफ्रिकेचा पाकवर 8 गड्यांनी विजय
कसोटी मालिका बरोबरीत, मुथूसॅमी ‘मालिकावीर’, केशव महाराज ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/रावळपिंडी
सिमॉन हार्मेरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर द.आफ्रिकेने गुरूवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी यजमान पाकचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव करुन दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. द.आफ्रिकेच्या सिमुरन मुथूसॅमीला ‘मालिकावीर’ तर केशव महाराजला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना यजमान पाकने केवळ चार दिवसांत जिंकून द.आफ्रिकेवर आघाडी मिळविली होती. पण रावळपिंडीच्या दुसऱ्या कसोटीत द.आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज हर्मेरने 50 धावांत 6 गडी बाद करत पाकला दुसऱ्या डावात 138 धावांत गुंडाळले. त्यामुळे द.आफ्रिकेला निर्णायक विजयासाठी 68 धावांची जरुरी होती. द. आफ्रिकेने दुसऱ्या डावात 12.3 षटकात 2 बाद 73 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी तर मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली.
या कसोटीत द.आफ्रिकेचे फिरकी गोलंदाज हर्मेर आणि केशव महाराज यांनी 17 गडी बाद केले. केशव महाराज दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता. द. आफ्रिकेचा कर्णधार मारक्रमने दुसऱ्या डावात 45 चेंडूत 8 चौकारांसह 42 धावा जमवित बाद झाला. नौमन अलीने त्याला पायचीत केले. मार्करम बाद झाला त्यावेळी द. आफ्रिकेला विजयासाठी केळ चार धावांची जरुरी होती. तिसऱ्या क्रमाकासाठी फलंदाजीला आलेला स्टब्ज नौमन अलीच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. द. आफ्रिकेच्या पहिल्या डावात 76 धावांची अर्धशतकी खेळी स्टब्जने केली होती. सलामीच्या रिकेल्टनने साजिद खानच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकला. रिकेल्टनने 29 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 25 धावा जमविल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 1000 बळींचा टप्पा ओलांडणारा हार्मेर हा द.आफ्रिकेचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. पाकच्या दुसऱ्या डावात नौमन अली हा हार्मेरचा 1000 वा प्रथम श्रेणीतील बळी ठरला.
द.आफ्रिकेच्या फिरकी माऱ्यासमोर पाकचा दुसरा डाव केवळ एक तासांत आटोपला. पाकने 4 बाद 94 या धावसंख्येवरुन गुरूवारी शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. पण त्यानंतर शेवटच्या दिवसाच्या खेळातील पहिल्या तीन षटकातच रिझवान आणि बाबर आझम हे तंबूत परतले. 49 धावांवर नाबाद राहिलेला बाबर आझमने 1 धाव घेत आपले अर्धशतक 87 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. हार्मेरने त्याला पायचित केले. मोहम्मद रिझवान हार्मेरचा पुढचा बळी ठरला. त्याने 18 धावा जमविल्या. पाकचा बाबर आझम याला 2022 च्या डिसेंबरपासून कसोटी क्रिकेटमध्ये आपले आजपर्यंतचे शतक नोंदविता आलेले नाही.
शेवटच्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर पाकने आपले दोन फलंदाज केवळ 20 मिनिटांच्या कालावधीत गमविले. त्यावेळी पाकचा संघ केवळ 34 धावांनी आघाडीवर होता. हार्मेरने नौमन अलीला खाते उघडण्यापूर्वीच व्हेरेनीकरवी झेलबाद केले. शाहीन आफ्रिदी चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. सलमान आगाने 42 चेंडूत 2 चौकारांसह 28 धावा जमविल्या. केशव महाराजने साजिद खानला यष्टीचीत करुन पाकचा दुसरा डाव 49.3 षटकात 138 धावांवर रोखला. साजिद खानने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. हार्मेरने 50 धावांत 6 तर केशव महाराजने 34 धावांत 2 तसेच रबाडाने 38 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक. प. डाव सर्वबाद 333, द. आफ्रिका प. डाव सर्वबाद 404, पाक. दु. डाव 49.3 षटकात सर्वबाद 138 (बाबर आझम 50, रिझवान 18, सलमान आगा 28, साजिद खान 13, हार्मेर 6-50, केशव महाराज 2-34), द. आफ्रिका दु. डाव 12.3 षटकात 2 बाद 73 (रिकल्टन नाबाद 25, मार्करम 42, स्टब्ज 0, झोर्झी नाबाद 0, अवांतर 6, नौमल अली 2-15)