द.आफ्रिका अ विजयी,मालिका भारताकडे
तिसऱ्या अनधिकृत वनडे सामन्यात द. आफ्रिकेचा 73 धावांनी विजय : सामनावीर प्रीटोरियस, मूनसामी यांची शतके, ऋतुराज गायकवाड मालिकावीर
वृत्तसंस्था/राजकोट
येथील निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात भारत अ संघाला दक्षिण आफ्रिकेकडून 73 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, पहिले दोन्ही सामने भारतीय अ संघाने जिंकल्याने मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. विशेष म्हणजे, भारताला तिसरा आणि अंतिम सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप करण्याची संधी होती. मात्र आफ्रिकेने शेवटच्या सामन्यात विजय मिळवत भारत दौऱ्याचा शेवट गोड केला.
तिलक वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय अ संघाला दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध बुधवारी पराभवाचा धक्का बसला. तिसऱ्या वनडेत आफ्रिकन संघाने भारतासमोर 326 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 252 धावांत ऑलआऊट झाला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून इशान किशन आणि आयुष बडोनी यांनी शानदार अर्धशतके झळकावली मात्र इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केल्याने टीम इंडियाला या सामन्यात हार पत्करावी लागली.
मालिकेत यश
भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्या दोन्ही सामन्यात फॉर्ममध्ये असणाऱ्या ऋतुराज गायकवाडला या सामन्यात मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. 25 धावा करुन तो बाद झाला. यानंतर डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा आणि पाठोपाठ तिलक वर्माही प्रत्येकी 11 धावा करुन माघारी परतले. याशिवाय, रियान परागही 17 धावांवर बाद झाल्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 82 अशी झाली होती. पण नंतर इशान किशन आणि आयुष बडोनी यांनी डाव सावरत 88 धावांची भागीदारी केली. इशानने 67 चेंडूत 53 धावांचे योगदान दिले तर आयुषने 66 चेंडूत 8 चौकारासह 66 धावा केल्या. ही जोडी मैदानात जमलेली असतानाच इशान बाद झाला. नंतर आयुषने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण 38 व्या षटकात आयुषला एनकाबायोम्झी पीटरने बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर पीटरने हर्षित राणालाही शून्यावर माघारी धाडले. नंतर निशांत संधू 10 धावांवर, मानव सुतार 23 आणि प्रसिद्ध कृष्णाही 23 धावा करून बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव 252 धावांत संपला. दक्षिण आफ्रिकेकडून एनकाबायोम्झी पीटरने 4 विकेट्स घेतल्या, तर शेपो मोरेकीने 3 विकेट्स घेतल्या.
प्रीटोरियसचे शतक
प्रारंभी, दक्षिण आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 325 धावा केल्या. ल्हुआन ड्रे प्रीटोरियसने 98 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारासह सर्वाधिक 123 धावांची शतकी खेळी केली. याशिवाय, रिवाल्डो मुनसामीने 13 चौकार आणि 2 षटकारासह 107 धावा फटकावल्या. या दोन्ही सलामीवीरांनी सलामीला तब्बल 241 धावांची भागीदारी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर रुबिन हर्मन (11) आणि क्वेशिल (1) लवकर बाद झाले. कर्णधार एकरमनही 16 धावांवर बाद झाला. डिआन फोरेस्टरने 20 आणि डेलानो पोटगिअरन नाबाद 30 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाकडून खलील अहमद, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाचे मालिकेत यश
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारत अ संघाने 2-1 असे यश मिळवले. पहिल्या दोन्ही सामन्यात तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दणक्यात विजय मिळवला. पण तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, मालिकेत 210 धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका अ 50 षटकांत 6 बाद 325 (प्रीटोरियस 123, मुनसामी 107, फोरेस्टर 20, पोटगिअरन नाबाद 30, खलील अहमद, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा प्रत्येकी 2 बळी) भारत अ 49.1 षटकांत सर्वबाद 252 (ऋतुराज गायकवाड 25, तिलक वर्मा 11, अभिषेक शर्मा 11, इशान किशन 53, आयुष बडोनी 66, पीटर 4 बळी, मोरेकी 3 बळी).