द. आफ्रिका अ संघाला 105 धावांची आघाडी
रिषभ पंतकडून पुन्हा निराशा : सुब्रायनचे पाच बळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरु असलेल्या चार दिवसांच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारत अ संघावर 105 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. दक्षिण आफ्रिका अ संघातील फिरकी गोलंदाज प्रनेलन सुब्रायनने 61 धावांत 5 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिका अ संघाने पहिल्या डावात 75 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर दिवसअखेर त्यांनी बिनबाद 30 धावा जमविल्या.
दक्षिण आफ्रिका अ संघाने 9 बाद 299 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा पहिला डाव 309 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिका अ संघातील जॉर्डन हर्मनने 8 चौकारांसह 71, हमझाने 1 षटकार आणि 9 चौकारांसह 66, रुबिन हर्मनने 6 चौकारांसह 54 आणि व्ह्युरेनने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 46 धावा जमविल्या. भारत अ संघातर्फे कोटीयनने 4 तर मानव सुतार, ब्रार यांनी प्रत्येकी 2, खलील अहमद व कंबोज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
भारत अ संघाने पहिल्या डावात 234 धावांपर्यंत मजल मारली. सलामीच्या आयुष म्हात्रेने 10 चौकारांसह 65, बदोनीने 5 चौकारांसह 38, साई सुदर्शनने 3 चौकारांसह 32, पाटीदारने 1 चौकारासह 19 तर कर्णधार ऋषभ पंतने 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. फलंदाजीत पंतकडून पुन्हा एकदा निराशा झाली. भारत अ संघाच्या पहिल्या डावात 30 अवांतर धावा मिळाल्या. दक्षिण आफ्रिका अ संघातील फिरकी गोलंदाज प्रेनेलन सुब्रायनने 61 धावांत 5 तर सिपाम्लाने 35 धावांत 2 गडी बाद केले. 75 धावांची आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिका अ संघाने दुसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 12 षटकात बिनबाद 30 धावा जमविल्या. जॉर्डन हर्मनने नाबाद 12 तर सेनोक्वेनने नाबाद 9 धावा केल्या. या सामन्यातील दोन दिवस बाकी असून दक्षिण आफ्रिका अ संघाची स्थिती थोडीफार मजबूत झाली आहे.
संक्षिप्त धावफलक - द. आफ्रिका अ प. डाव 91.2 षटकात सर्वबाद 309, भारत अ प. डाव 58 षटकात सर्वबाद 234 (म्हात्रे 65, साई सुदर्शन 32, बदोनी 38, पाटीदार 19, अवांतर 30, प्रेनेलन सुब्रायन 5-61, सिपाम्ला 2-35), द. आफ्रिका अ दु. डाव 12 षटकात बिनबाद 30.