प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी सौरव गांगुली
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची द.आफ्रिकेतील एसए 20 लीगसाठी प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. प्रशिक्षक म्हणून ते पहिल्यांदाच कार्यरत होणार आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेले गांगुली हे इंग्लंडचे माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट यांची जागा घेतील. ‘कॅपिटल्स कॅम्पमध्ये एक शाही लहर आणण्यास प्रिन्स सज्ज आहेत. सौरव गांगुली यांना आमचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे फ्रँचायझीने इंस्टाग्रामवर म्हटले आहे.
गांगुली पहिल्यांदाच क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. 2018 ते 2019 दरम्यान, गांगुली आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचे संघसंचालक होते. बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडले. प्रिटोरिया कॅपिटल्सची मालकी दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक असलेल्या जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सकडे आहे.
गेल्या वर्षी गांगुली यांची जेएसडब्ल्यूचे क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एसए-20 च्या 2025 च्या हंगामापूर्वी ट्रॉटची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती परंतु संघाला 10 पैकी फक्त दोन विजय मिळविल्याने बाद फेरी गाठता आली नाही, सहा संघांच्या एसए टी-20 लीगमध्ये या संघाला पाचवे स्थान मिळाले होते.