Kolhapur : कोल्हापुरात फटाक्यांची ध्वनी मापन चाचणी; 18 फटाक्यांची तपासणी, नियमभंग झाल्यास कारवाई होणार
एमपीसीबीची दिवाळीपूर्व चाचणी मोहीम
कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल (एमपीसीबी) कोल्हापूर कार्यालयाने फटाक्यांची ध्वनीमापन चाचणी घेतली. ही चाचणी दरवर्षी घेण्यात येते, ज्यात फटाक्यांच्या ध्वनी पातळीची तपासणी केली जाते. यंदा सायबर कॉलेज परिसरात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध १५ हून अधिक एकटे आणि मालिका प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली.
प्रादेशिक अधिकारी एमपीसीबी कोल्हापूर निखिल घरत, डॉ. चेतन भोसले, सायबर कॉलेजचे डीन डी. एस. माळी, निसर्ग मित्र अनिल चौगुले, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पीएसआय किरण कागलकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, डॉ. प्रिया पाटील, राजा हंसल उपस्थित होते.
ही चाचणी फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. फटाक्यांची ध्वनी मापन चाचणी ही पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ आणि ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत अनिवार्य आहे.
केंद्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) ने फटाक्यांसाठी ध्वनी मर्यादा निश्चित केली आहे. एका फटाक्याची ध्वनी पातळी ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबल (डीबी) पेक्षा जास्त नसावी. फटाके उत्पादकांनी उत्पादित फटाके ध्वनी मयदित आहेत की नाही हे तपासणे हा प्रमूख उद्देश असतो. जर मर्यादा ओलांडली तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. अतिरिक्त ध्वनीमुळे कानाचे नुकसान, तणाव, हृदयरोग आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. विशेषता लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा त्रास होतो.
ही चाचणी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते. एमपीसीबी ही चाचणी पोलीस आणि इतर विभागाच्या सहकार्याने घेते. सर्व सुरक्षा विचारात घेऊन चाचणीत १८ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली, ज्यात लहान मोठे फटाके आणि बॉम्ब्स सारख्या फटाक्यांची तपासणी झाली. चाचणीनंतर अहवाल मुंबईतील सीपीसीबी मुख्यालयाकडे पाठवला जातो, ज्यातून उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होते.