जवारी-इंदोर बटाटा, कांदा दरात पुन्हा वाढ
आवकेत घट झाल्याचा परिणाम : मोजक्या भाजीपाल्यांचे दर वाढले : इतर भाजीपाल्यांचे दर मात्र स्थिर : टोमॅटो, कोथिंबीर दरात किंचित घट
सुधीर गडकरी/अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात जवारी बटाटा भाव क्विंटलला 500 रुपयांनी वधारला तर कांदा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वधारला. तसेच इंदोर बटाटा भाव क्विंटलला 100 रुपयांनी वधारला आहे. हासन बटाटा आवक मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आली नाही. तसेच इंदोर बटाटा ट्रकादेखील मोजक्याच दुकानामध्ये विक्रीसाठी आल्याने बटाटा आवकेत घट निर्माण होऊन सहजच बटाटा दरात वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. आग्रा बटाटा, रताळी यांचा दर मात्र क्विंटलला स्थिर आहे. परराज्यामध्ये कांद्याची मागणी वाढल्याने कर्नाटक कांदा दरात देखील वाढ झाली आहे. यामुळे यंदा कांद्याने अर्धशतक पार केले आहे. भाजीमार्केटमध्ये सध्या मोजक्या भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. टोमॅटो व कोथिंबीर यांच्या दरात थोड्या प्रमाणात घसरण झाली आहे. व इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. बिन्स बेंगळूरहून मागविण्यात येत आहे तर गाजर इंदोरहून मागविण्यात येत आहे. तर बेळगाव बटाटा खरेदीसाठी परराज्यातील खरेदीदार मार्केट यार्डमध्ये दाखल झाले आहेत.
500 रुपयांनी बेळगाव बटाटा दरवाढ
बेळगाव-खानापूर तालुक्यामध्ये यंदा बटाटा लागवड जास्त प्रमाणात केली आहे. तरी पावसाच्या पाण्यामुळे बटाटा जमिनीमध्ये पाणी तुंबून काही प्रमाणात उत्पादनात घट निर्माण झाली असली तरी काही प्रमाणात रोपांवर रोग पडून उत्पादनात घट निर्माण झाली आहे. यातच परराज्यातील इंदोर बटाटा ट्रकादेखील विक्रीसाठी कमी प्रमाणात येत असल्यामुळे मार्केट यार्डमध्ये बटाटा आवकेत घट निर्माण झाली आहे. दरवर्षाप्रमाणे परराज्यातील दिल्ली, मुंबई, पलवल आदी ठिकाणचे खरेदीदार सध्या बेळगाव मार्केट यार्डमध्ये दाखल झाले आहे. बेळगाव बटाटा खाण्यासाठी चवदार असतो व वेफर्स बनवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे बटाटा भाव 500 रुपयांनी वाढला आहे, अशी माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.
कांदा इतर राज्यात मागणी
महाराष्ट्र कांदा उत्पादन काढणी जानेवारी महिन्यामध्ये सुरुवात होते. त्यानंतर इतर प्रदेश, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये कांदा उत्पादन काढणीला सुरुवात होते. सध्या या ठिकाणी कांदा नसल्यामुळे आता कर्नाटकातील कांद्यावर अवलंबून रहावे लागत आहे. बेळगावसह हुबळी मार्केट यार्डमधून इतर राज्यामध्ये मागणी असल्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळत आहे. सध्या कांदा कच्चा आहे व लालसर आहे. पाकड कांदा येण्यास अद्याप 15 ते 20 दिवस लागणार आहेत. शनिवारी 230 ट्रक कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता, अशी माहिती कांदा व्यापाऱ्याने दिली.
इंदोर बटाट्याची टंचाई
सध्या इंदोर बटाटा लागवड केली आहे आणि पावसामुळे काही प्रमाणात पिके वाया गेली आहेत. याचे उत्पादन देखील डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढणीला प्रारंभ केला जातो. काढणीनंतर मार्च, एप्रिलमध्ये शितगृहामध्ये मोठ्या प्रमाणात तेथील तेजी-मंदीचे व्यापारी साठवणूक करतात. त्यानंतर मे महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील विविध बाजारात मागणीनुसार विक्रीसाठी पाठविला जातो. यामुळे सध्या शितगृहातील बटाटा देखील 70 टक्के संपला आहे. यामुळे शनिवारी मार्केट यार्डमध्ये थोड्या प्रमाणात इंदोर बटाटा विक्रीसाठी आला असून याचा भावदेखील क्विंटलला 100 रुपयांनी वाढला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रताळी भाव स्थिर
बेळगाव तालुक्यासह खानापूर तालुक्यामध्ये रताळी काढणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. कारण गेल्या आठवडाभरापासून उघडीप पडली आहे. मार्केट यार्डमध्ये रताळी आवक दिवसेंदिवस वाढत आहे. रताळी भाव मात्र स्थिर आहे.
कोथिंबीर, टोमॅटो दरात घट
भाजीमार्केटमध्ये बेळगाव परिसरातील भाजीपाला आवक विक्रीसाठी येत आहे. गाजर नाशिकहून तर बिन्स बेंगळूरहून येत आहे. टोमॅटो आणि कोथिंबीरची आवक वाढली असून यांच्या दरात घट निर्माण झाली आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. सध्या गोवा आणि कोकण पट्ट्यामध्ये भाजीला रोजच्याप्रमाणे मागणी आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.