जिल्ह्यात ज्वारी हमीभावापासून दूर
प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांची मागणी, उत्पादन खर्च निघत नसल्याची खंत
बेळगाव : ज्वारी उत्पादनाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्पादनासाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. यासाठी ज्वारीला प्रति क्विंटल 6 हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी केली आहे. राज्यात बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. उसानंतर ज्वारी अधिक पिकतो. मात्र योग्य हमीभावअभावी तो कवडीमोलाने विकण्याची वेळ येऊ लागली आहे. त्याबरोबर भाजीपाल्यालाही अपेक्षीत दर मिळत नसल्याने कोबी आणि इतर भाजीपाल्यावर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या पिकाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी, कृषी खाते आणि लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
इतर राज्यात 6 हजार रुपये दर
इतर राज्यात ज्वारीला प्रति क्विंटल 6 हजार रुपये दर दिला जात आहे. मात्र सद्यस्थितीत बाजारात प्रतिक्विंटल 3 ते 4 हजार रुपये भाव निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. अपेक्षीत दर मिळत नसल्याने उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्याचे सांगण्यात आले आहे. बेळगाव सैंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल, निपाणी, चिकोडी, हुक्केरी आदी तालुक्यांमुळे ज्वारीचे उत्पादन केले जाते. रब्बी हंगामातील ज्वारी उत्पादनाला प्रारंभ झाला आहे. मात्र शेतकऱ्यांना योग्य हमीभावापासून दूर रहावे लागले आहे. तर काही ठिकाणी नाईलाजास्तव शेतकऱ्यांना मिळेल त्या दराला ज्वारी विकण्याची वेळ आली आहे. सरकारने याची दखल घेऊन ज्वारीला प्रति क्विंटल कमीतकमी 6 हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणीही केली आहे.