सोनोली-कुद्रेमनी संपर्क रस्ते हरवले खड्ड्यांत
वाहनधारकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास, प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांतून संताप : त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर /किणये
ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यातही प्रामुख्याने रस्त्यांचे डांबरीकरण व त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सरकारकडून विशेष निधी मंजूर केला जातो. तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांचे डांबरीकरण होत आहे. मात्र सोनोली व कुद्रेमनी या संपर्क रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्या असल्याच्या तक्रारी वाहनधारक व परिसरातील नागरिकांतून होत आहेत. यामुळे आम्ही दाद मागायची कोणाकडे? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सोनोली ते कुद्रेमनी फाट्यापर्यंत एक रस्ता व अन्य कुद्रेमनी गावाला जाणारा असे दोन रस्ते दुर्लक्षित झालेले आहेत. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे. सध्या या भागात ऊस तोडणीचे काम जोमाने सुरू आहे. त्यामुळे ट्रॅक्टर व ट्रक यांची वाहतूक चालू आहे. मात्र खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणे मुश्किल बनले आहे, अशी माहिती वाहनधारकांनी दिली आहे.
सोनोली गावापासून ते मार्कंडेय नदीवरील पूल व त्यापुढील काही अंतरापर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण गेल्या दोन वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. त्यामुळे या अर्ध्या रस्त्यासंदर्भात शेतकरी व वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे पुलापर्यंत रस्ता झाला असल्याने इथपर्यंतची वाहतूक सोयीस्कर बनली आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. मात्र त्यापुढे कुद्रेमनी फाट्यापर्यंत रस्त्यांची वाताहत झाली आहे. सोनोली, कुद्रेमनी, यळेबैल, राकसकोप, बेळगुंदी, बेळवट्टी, इनामबडस, सुरुते, ढेकोळी व शिनोळी या भागातील वाहनधारकांची या दोन्ही रस्त्यांवर रोज मोठ्या संख्येने वर्दळ असते. मात्र खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारक अक्षरश: वैतागून गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
या भागातील वाहनधारकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता
सोनोली फाट्यापासून ते कुद्रेमनी गावापर्यंत संपर्क रस्ता गेलेला आहे. या संपर्क रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गेल्या 12 ते 13 वर्षांपूर्वी या रस्त्यांचे कामकाज करण्यात आले होते. सध्या या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या भागातील वाहनधारकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र इथल्या वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यातूनच ये-जा करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वार खड्ड्यांमध्ये पडून किरकोळ जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत.
- जोतिबा पाटील, यळेबैल
लोकप्रतिनिधींनी रस्त्याची पाहणी करावी
सोनोली रस्त्यावरील मार्कंडेय नदीच्या पुलानंतर रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरूनच गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतशिवारात जावे लागते. मात्र खड्ड्यांच्या रस्त्यामुळे वाहनधारक वैतागून गेले आहेत. पश्चिम भागातील बेळगावच्या सीमेवरील व शिनोळी भागातील सीमेवरील वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी हे दोन्ही महत्त्वाचे संपर्क रस्ते आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची पाहणी करून, त्वरित दुरुस्तीचे कामकाज सुरू करावे.
- सुनील झंगरुचे, सोनोली