For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस संसदीय पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

06:01 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस संसदीय पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड
Advertisement

राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते करण्याची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा शनिवारी सायंकाळी करण्यात आली. दिल्लीत आयोजित पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनियांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. गौरव गोगोई आणि तारिक अन्वर यांनी पाठिंबा दर्शवला. मात्र, लोकसभेतील विरोधी पक्षनेता निवडीबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. सध्या राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यांनी नावनिश्चितीबाबत विचार करण्यासाठी काही मुदत मागितली आहे.

Advertisement

काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक शनिवारी आमंत्रित करण्यात आली होती. यामध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राहुल गांधी वायनाडची जागा सोडतील आणि रायबरेलीची जागा स्वत:कडे ठेवतील, असे संकेतही देण्यात आले आहेत. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका यांच्या व्यतिरिक्त, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित खासदारांनी सीडब्ल्यूसी बैठकीला हजेरी लावली. लोकसभेत जिंकलेल्या आणि पराभूत झालेल्या जागांवरही बैठकीत चर्चा झाली.

तीन तास चालली सीडब्ल्यूसी बैठक

दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सीडब्ल्यूसीची बैठक सुमारे 3 तास चालली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत पक्षाध्यक्ष खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या लोकसभा निवडणुकीतील योगदानाचे कौतुक करण्यात आले. याबाबतचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याचा ठरावही मंजूर केला. यावर राहुल गांधी यांनी ‘मला विचार करायला वेळ द्या.’ असे त्यांनी सांगितले.

‘आप’पासून दूर राहण्याचा पवित्रा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा फटका बसला असून त्यांना केवळ तीन जागा मिळाल्या. त्यामुळे आता केजरीवाल यांच्या पक्षापासून दूर राहण्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. ‘केजरीवाल यांच्यासह बडे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुऊंगात गेल्याने आणि स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे काँग्रेस पक्षाला आघाडीतून नुकसान सहन करावे लागले. पंजाबमध्ये आमची ‘आप’सोबत युती झाली नाही, त्याचा थेट फायदा आम्हाला झाला आहे, असे काँग्रेस महिला मोर्चाच्या अध्यक्षा अलका लांबा म्हणाल्या.

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद 10 वर्षांपासून रिक्त

गेल्या 10 वर्षांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. 2014 मध्ये काँग्रेसला 44 तर 2019 मध्ये 52 जागा मिळाल्या होत्या. भाजपनंतर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तरीही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची मिळाली नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागा कोणत्याही पक्षाकडे असणे आवश्यक आहे. म्हणजेच 543 जागांपैकी काँग्रेसला यासाठी 54 खासदारांची गरज आहे. यावेळी काँग्रेसने स्वबळावर 99 जागा मिळवल्या आहेत. 2014 मध्ये विरोधी पक्षात सर्वात मोठा पक्ष असूनही माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यास नकार दिला होता. गेल्या लोकसभेत काँग्रेसची कामगिरी थोडी चांगली होती, पण तरीही त्यांना 54 जागा जिंकता आल्या नाहीत. अधीर रंजन चौधरी यांना काँग्रेसचे नेते करण्यात आले असले तरी कोणीही विरोधी पक्षनेते होऊ शकले नाही.

Advertisement

.