वास्तवाची गाणी...
माणसाला स्वप्नं बघायला फार आवडतं. त्याचा माणसाच्या आर्थिक परिस्थितीशी काहीही संबंध नसतो. तर ते रस्त्यावर राहणारे, पाईपमध्ये राहणारे, हमाल, मजूर, इथपासून ते पंतप्रधान, राष्ट्रपती, राजा, सर्वांना स्वप्नं पाहायला आवडतात. स्वप्ननगरीत विहार करायला प्रत्येकालाच हवं असतं. स्वप्नांचे रंगही अनेक असतात. पण एकूण प्रश्न असा पडतो की माणूस स्वप्न बघतो तरी कशाला? ज्याअर्थी माणसाला स्वप्नं बघायला आवडतात, त्याअर्थी ती तो माणूस प्रत्यक्षात बघत असलेल्या आयुष्यापेक्षा नक्कीच वेगळी असतात. कारण माणसाला वेगळेपणाची ओढ असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुखात राहायला प्रत्येकाला आवडतं. म्हणजे जिथे सुख मिळेल जिथे जास्तीत जास्त सुख मिळेल, आनंद मिळेल, तिकडे मानवी मन धाव घेत असतं. म्हणजे माणसाला स्वप्न बघायला आवडतात. याचा अर्थ माणसाला त्यात आनंद मिळतो मग आता पुढचा प्रश्न पडतो की प्रत्यक्षात जगत असलेल्या आयुष्यात माणूस समाधानी नसतो का?
सहज मिळे तेथे जीव तृप्तता न पावे
जे सुदूर, जे असाध्य तेथे मन धावे
आयुष्यभर शेकडो, हजारो यशस्वी आणि लोकप्रिय गीते लिहित आलेल्या शांताबाई शेळके यांचे शब्द आहेत हे! त्यांनी मानवी मनाच्या प्रवृत्तीचं यथार्थ वर्णन या कवितेत केलेलं आहे. स्वप्नं पाहूच नयेत का? तर असं काही नाही आपल्याला जे मिळवायचे आहे त्याचं आधी स्वप्न पाहायला शिकावं लागतं. मग ते स्वप्न वास्तवात आणण्याच्या दिशेने आपली धडपड सुरू होते. आणि ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ जर बघत राहिलो तर आयुष्यात काहीच साध्य होणार नाही. तर नुसती स्वप्नं न बघता ती स्वप्नं पुरी कशी होतील यासाठी अविरत परिश्रम, योग्य दिशा, धडपड आणि आयुष्य खर्च करणे हे सगळं सगळं व्हावं लागतं. तेव्हा ती स्वप्नं पूर्ण होतात. पण म्हणजे सुरुवातीला ती स्वप्नंच असतात. आणि ह्या सगळ्याचा उलटासुलटा विचार केल्यानंतर एकच गोष्ट समोर येते. तिचं नाव आहे वास्तव. स्वप्नांच्या दुनियेची पाठची बाजू! बऱ्याचदा जे कडू असतं, जे चटके देणारं असतं, ज्याला स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो आणि ज्याला तोंड देण्यातच आपलं बहुतांश आयुष्य खर्च होत असतं ते हे वास्तव. अर्थात हकीगत, सत्य परिस्थिती. स्वप्नं ही गोष्ट इतकी गोड असते, की त्याच्यावरती गाणी होतात. खूप खूप गाणी होतात. जसं की ‘तेरे मेरे सपने’, ‘कौन है जो सपनो मे आया’, ‘ए मेरे सपनो के सौदागर’ आणि इतर असंख्य गाणी असतील! वास्तवावर गाणी असतात का? वास्तव एवढं कठोर, कोरडं असतं की त्याच्यावर गाणी काय, गोष्ट सुद्धा होऊ शकत नाही असं वाटतं आपल्याला. पण तसं नसतं. संगीत हा विषय सर्वव्यापी आहे. त्याने विश्व व्यापलेलं आहे. तेव्हा वास्तव या गोष्टीवरची गाणी नसतील असं शक्यच नसतं.
अरे संसार संसार, जसा तवा चुह्यावर
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर
खेड्यातल्या लिहितावाचता न येणाऱ्या, परंतु आयुष्याचं सार उमगलेल्या एका फार मोठ्या कवयित्रीच्या या ओळी आहेत. यांचं पुढे जाऊन गाणं झालं. ते उत्तरा केळकर यांनी गायलेलं आहे. याशिवायही त्याला असंख्य चाली लागलेल्या आहेत. कारण मुळात हे लोकगीत आहे. आहे ना वास्तवाचे चटके कसे असतात हे सांगणारं गाणं? वास्तवावर गाणी नसतात असं कोण म्हणेल? वास्तवाचं सगळ्यात जास्त रुजलेलं हेच तर गाणं आहे! वास्तवाचं अत्यंत सुंदर आणि स्वप्नवत वाटेल असं गाणं विंदा करंदीकर लिहून जातात
पवित्र सुखदु:खांची गाणी
वेदातील साऱ्या मंत्रांहुन
पवित्र साधा मानवप्राणी
श्रीरामाहुन श्रीकृष्णाहुन
वास्तवाचं कौतुक म्हणाल तर हेच असतं. की माणसाला आयुष्य आहे तसं स्वीकारण्यासाठी जे घडवतं ते वास्तव. माणसाला आयुष्याच्या पाठशाळेत सगळ्यात जास्त शिकवतं, ते हे वास्तव. ज्यामुळे माणूस रिकामी स्वप्नं बघण्यापासून परावृत्त होतो ते हे वास्तव. आणि जे आपलं खरोखर जगणं असतं तेच हे वास्तव असतं. आणि म्हणून वास्तवाची गाणी ही जिथे तिथे रुजलेली सहजच आढळतात कधी कधी ते काव्यात्म भाषेत असतात. पण असतात वास्तवाचीच. उदाहरणार्थ,
मना तुझे मनोगत कधी मला कळेल का?
तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का?
मानवी मन हे आजवर कोणालाच पुरेसा थांग न लागलेली गोष्ट आहे हे वास्तव आहे. फक्त मांडताना सुधीर मोघेंनी ते काव्यात्मक भाषेत मांडलेलं आहे. आणि ज्या कलाकारांचा वास्तवाचा अभ्यास चांगला असतो किंवा ज्यांनी वास्तवाचे विदारक चटके भोगलेले असतात त्यांच्या कंठी येताना ते गाणं समजून समजून पचून आलेलं असतं. याच्या गायिका आयुष्यात खूप दाहक वास्तवाला सतत सामोऱ्या गेल्या. ते गाणं प्रभावी होण्यामागे याही गोष्टीचा परिणाम नसेल का?
वास्तववादी गाणी किंवा वास्तव या विषयावरची गाणी तशी खूप घडलेली आहेत. पण गाण्यात वास्तविकता सुंदर रीतीने मांडणे यामध्ये संदीप खरे यांची हातोटी आहे असे म्हणावे लागेल. सरळ साधे शब्द वापरून अत्यंत प्रभावी गाणी, जी पुढे जाऊन गाजली आणि लोकप्रिय झाली अशी कितीतरी गाणी त्यांनी लिहिलीत. उदाहरणार्थ
दिवस असे की कोणी माझा नाही
अन् मी कोणाचा नाही
याशिवायही ‘मी मोर्चा नेला नाही’, ‘साहेब म्हणतो चेपेन चेपेन’, ‘आताशा मी फक्त रकाने..’ यासारखी कितीतरी गाणी आहेत जी पुरेशी बोलकी आहेत. वास्तव म्हणजे काय असतं ते मांडणारी आहेत. वास्तव हे आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. खरं तर वास्तव हेच आयुष्य असतं, तेच आपल्याला जगायचं असतं म्हणून
लळा जिव्हाळा शब्दच खोटे
माश्या मासा खाई.
कुणी कुणाचे नाही राजा
कुणी कुणाचे नाही.
यांसारखी अजरामर गाणी जन्माला येतात. वास्तव हे किती कडू आणि विदारक वाटत असलं तरीही त्याचा एक खूप खूप महत्त्वाचा भाग म्हणजे आयुष्य स्वप्नांवर चालत नसून वास्तवावरच चालत असतं. म्हणून वास्तविकता हा आयुष्याचा पाया असतो. मानवी आयुष्याचे सर्वच्या सर्व व्यवहार किंबहुना व्यवहार ही गोष्टच मुळात वास्तवावर चालत असते. म्हणून व्यवहार आणि भावना वेगळ्या ठेवाव्या लागतात.
आणि खरं बघितलं तर वास्तव असतं म्हणूनच आपल्याला स्वप्नांची किंमत कळते. जेव्हा वास्तव कठीण होतं तेव्हा ते सोपं करण्यासाठी आपण स्वप्नं बघायला शिकतो. ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण वास्तवाला सतत टक्कर देत राहतो. आणि शेवटी काय करतो? तर आपण बघितलेली सुंदर स्वप्नं आपण वास्तवात उतरवतो. स्वप्नं जेव्हा वास्तवात रूपांतरित होतात तेव्हाच ती जास्त गोड होतात. म्हणूनच वास्तवाहून गोड आणि सुंदर दुसरं काय ठरेल बरं?
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु