इन्सुलीच्या सोनाली गावडेचा मृत्यू की घातपात ?
दुसऱ्या दिवशी सापडलेल्या मोबाईलने संशय बळावला ; तपासाच्या मूळापर्यंत जाण्यास पोलीस अद्याप अपयशी
प्रतिनिधी
बांदा
इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) हिच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासाच्या मूळापर्यंत जाण्यास बांदा पोलीसांना अद्याप यश आले नसून सोनालीचा मृत्यू नेमका कसा झाला याचे गूढ वाढत आहे .सोनालीचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्याठिकाणी मिळालेल्या दोन छत्र्या, दोन फूट पाण्यात घराच्या आसपास आढळून आलेला मृतदेह व पहिल्या दिवशी न सापडता दुसऱ्या दिवशी आढळून आलेला मोबाईल यामुळे या मागे कोणाचा तरी हात असेल असे उघडपणे बोलले जात आहे. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन पोलीस तपास न करत असल्याने पोलिसांचा तपास दिशाहीन होत असल्याची चर्चा सुरु आहे. एकंदरीत या युवतीसोबत घातपात झाला की तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला याचा छडा लागणे गरजेचे आहे. खरोखरच जर तिच्या मृत्यूमागे घातपात असेल तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहे. इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली गावडे ही युवती मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे साऊथ कोकण डिस्टलरिज मध्ये कामाला गेली. मात्र ती कंपनीत कामाला गेली नाही आणि घरी पण परतली नाही. नेहमीप्रमाणे सायंकाळी ती घरी न परतल्याने रात्री उशिरा घरच्यांनी व शेजारच्यांनी शोध घेतला. तसेच याबाबत बेपत्ता असल्याची खबर बांदा पोलिसात दिली होती. मात्र सकाळी तिचा मृतदेह तिच्या कामावर गेलेल्या ड्रेसवर बॅग लावलेल्या स्थितीत आढळून आला. मात्र तिचा दोन फुट पेक्षा कमी पाण्यात आढळून आलेल्या मृतदेहामुळे उपस्थितानी तिच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी बांदा यांनी स्पष्ट केले.मात्र, ज्यावेळी तिचा मृतदेह सापडला त्यावेळी तिच्या आसपास तिच्या अन्य साहित्याची तपासणी केली होती. दरम्यान त्यावेळी तिच्या पाठीला लावलेली बॅग आणि त्यातील सामान जशास तसे होते. तर तिच्या मृतदेहाच्या बाजूला एक छत्री पण आढळून आली होती पण तिचा मोबाईल पहिल्या दिवशी कोठेच आढळून आला नव्हता. त्यामुळे संशय निर्माण झाला होता. दरम्यान त्यावेळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बांदा येथे आणण्यात आला. दरम्यान दुसऱ्या दिवशी गुरुवारी बांदा पोलीस पुन्हा मोबाईल शोधण्यासाठी घटनास्थळी गेले असता मृतदेह सापडल्याच्या काही अंतरावर एक छत्री व त्याच्याखाली तिचा मोबाईल आढळून आला. मृतदेहा जवळ असणारी छत्री तिची नाही असे तिच्या घरच्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी आढळलेली छत्री तिची असल्याचे घरच्यांनी सांगितले मग ती दुसरी छत्री कोणाची हा प्रश्न अधांतरीच आहे. तर पहिल्या दिवशी मोबाईल न आढळून येता अचानक दुसऱ्या दिवशी मोबाईल तेथे कसा सापडला हे सर्व प्रश्न तिच्या मृत्यूबाबत संशय निर्माण करणारे आहेत. याबाबत बांदा पोलिसांनी सखोल तपास करून या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज आहे. आज निष्पाप युवतीचा जीव जर कोणी घेतला असेल तर त्याला गजाआड करण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे अशी मागणी होत आहे.