आईच्या खूनप्रकरणी मुलास जन्मठेप
वडूज :
‘माझे लग्न का करत नाही’, या कारणावरून आईचा खून केल्या प्रकरणी आरोपी मुलगा किरण शहाजी शिंदे (वय 32, रा. मोराळे, ता. खटाव) यास वडूज येथील अतिरिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबतच्या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, दि.11/12/2019 रोजी रात्री 10:30 ते दि. 12/12/2019 चे मोराळे येथे फिर्यादीचे राहते घरात यातील आरोपी याने मयत कांताबाई शहाजी शिंदे (आई) हिस म्हणाला की, ‘माझ्या मागच्या मुलांची लग्न झाली, तुम्ही माझे लग्न का करीत नाही’, असे म्हणून यातील फिर्यादी वडील शहाजी बाबुराव शिंदे यांना घरातून लाथ मारून बाहेर काढले व घरास आतून कडी लावून मयत कांताबाई शहाजी शिंदे हिस शिवीगाळ दमदाटी करून कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून गंभीर जखमी करून खून केला. तसेच यातील फिर्यादी व साक्षीदार यास तुम्ही घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचाही खून करीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या गुह्यात पो.उप.नि. एस. सी. गोसावी यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध अति. जिल्हा व सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयात याकामी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजित प्रताप कदम (साबळे) यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपी किरण शिंदे यास भा.द.वि.स कलम 302 अन्वये जन्मठेप व 5000 रू दंड व दंड न भरल्यास 1 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
हा खटला चालवणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत व पो. नि. घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पो. उप. नि. दत्तात्रय जाधव, म. पो. हवा. विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ. सागर सजगणे, पो. कॉ. अमीर शिकलगार व पो. कॉ. जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.