मुलाला मृत्यूदंड; बापाला जन्मठेप
एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्याप्रकरणी शिक्षा
कारवार : भटकळ तालुक्यातील कल्याणी येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्या प्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी एका आरोपीला मृत्यूदंडाची तर अन्य एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मृत्यूदंड शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव विनय श्रीधर भट असे आहे. तर जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीधर भट असे आहे. श्रीधर भट हे विनय भट याचे वडील आहेत. 2023 मधील फेब्रुवारी महिन्यात भटकळ तालुक्यातील ओणीबागीलू येथील एकाच कुटुंबातील शेतकरी शंभू भट (वय 70), त्यांची पत्नी माधवी भट (वय 60), पुत्र राघवेंद्र (वय 40) आणि सून कुसुमा (वय 35) यांची चाकूने भोसकून भीषण हत्या करण्यात आली होती. घटनेच्यावेळी घरात झोपलेले एक लहान बालक आणि शेजारच्या घरात खेळायला गेलेले आणखी एक बालक बचावले होते. तथापि या बालकांच्या आई-वडिलांची हत्या झाल्याने ती अनाथ झाली होती.
घटनेनंतर भटकळ ग्रामीण पोलिसांनी प्रकरणाची कसून चौकशी केली असता हे हत्याकांड जमिनीच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेच्या सात महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या शंभु भट यांच्या मोठ्या पुत्राचे निधन झाले होते. निधन झालेल्या पुत्राची पत्नी विद्या आणि तिच्या माहेरच्या मंडळीने, विद्या हिच्या वाट्याच्या जमिनीवरून सासरच्या मंडळीशी भांडण केले होते. भांडण विकोपाला गेल्याने विद्याचे वडील श्रीधर भट आणि तिचा भाऊ विनय भट यांनी शंभु भट, माधवी भट, राघवेंद्र भट आणि कुसुमा यांचा चाकूने भोसकून खून केला होता. मारेकरी पिता-पुत्राला ताब्यात घेऊन भटकळ ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश डी. एस. विजयकुमार यांनी अनेक साक्षीदारांची चौकशी करून विनय भट याला मृत्यूदंडाची तर श्रीधर भट याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. प्रकरणातील तिसरी आरोपी विद्या भट यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा न मिळाल्याने त्यांना अपराधमुक्त करण्यात आले आहे.