पुत्र मानवाचा...
यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महादधौ
समेत्य च व्यपैयातां तद्वत भूतसमागम:
अर्थातच दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गाठ.
काही हजार वर्षांपूर्वीचं हे संस्कृत सुभाषित! ज्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून गौरविलेलं आहे त्या गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांनी गीतारामायणातल्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या गाण्यात याच सुभाषिताचे प्रतिशब्द योजले आहेत. यमनची एक अतिशय वेगळी आणि अतिशय लालित्यपूर्ण समजली जाणारी ही वेगळ्याच टाक्यांची वीण आहे. जी संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी गुंफलेली आहे. गीतरामायणातलं तसं पाहता प्रत्येकच गाणं हे आपापल्या परीने एक एक हिमशिखरच आहे. परंतु त्यातली काही गाणी अशी आहेत की जी फारच उच्च दर्जाचं अध्यात्म आणि त्यातली तत्वं सहज साध्या सोप्या शब्दात आपल्यासमोर आणून ठेवतात. अर्थात हे आणून ठेवणं सहज असलं तरी याच्यामागचा आशय मात्र खूपच विराट आहे.
संगीतकारांच्या विचारांप्रमाणे असं असतं, की खूप खोलवर असलेल्या आशयाच्या अभिव्यक्तीसाठी संगीतातील रागांची योजना करताना तो राग देखील तसाच मोठा असावा लागतो. त्याच्यात चिंतन करण्यासारखं खूप काही असावं लागतं. म्हणूनच की काय पण बाबूजींनी यमन सारखा शांतरसप्रधान भक्तिरसप्रधान राग यासाठी वापरलेला आहे. आयुष्यातले खूप मोठे धक्के खूप मोठी दु:खं पचवून झाल्यानंतर त्या अनुभवाने समृद्ध झालेलं व्यक्तिमत्व ज्या वेळेला आयुष्यातलं मोठं सत्य सांगत असतं त्या वेळेला त्याच्या तोंडी हे शब्द येतात.
हे जग हा एक भला मोठा रंगमंचच म्हणावा लागेल. ज्या रंगमंचावर नाटकांचे जे प्रयोग चालतात त्यात पुढचा डायलॉग काय असेल हे त्याच्या अगोदरच्या क्षणाला माहीत नसतं. रामरायाला राज्याभिषेक होण्याच्या समारंभासाठी काही तास शिल्लक उरलेले असताना राजसिंहासन सोडून एकाएकी त्याला वनवासाचा मार्ग धरावा लागेल असं त्यावेळी कोणीही कोणाला सांगितलं असतं तरी ते कुणालाच पटलं नक्कीच नसतं. पण शेवटी त्याच्या नशिबी योग्य त्या वेळेला आणि सर्वांची इच्छा असताना राजसिंहासन काही नव्हतं. एकाएकी त्या जगनियंत्याने चालवलेल्या खेळाला कलाटणी मिळाली आणि साक्षात रामराया 14 वर्षाच्या वनवासात निघून गेले. एक हसतंखेळतं कुटुंब, एक राजपरिवार, फार मोठ्या धक्क्याला सामोरा गेला. त्यांचा राजाच बदलला. त्यांचं भविष्य बदललं. आणि पुढे रामराया आणि सीतामाईला सुद्धा फारच वेगळ्या आयुष्याला आणि खाचखळग्यांना सामोरं जावं लागलं. स्वत: लिहिलेले डायलॉग देव स्वत:साठी सुद्धा कधी बदलत नसतो हेच तर यातून सांगायचं नसेल? या पृथ्वीवरच्या माणसांचं आयुष्य हे अळवावरचं पाणी असतं. कुठल्याही नातेसंबंधांची शाश्वती देता येत नाही. कोणत्या क्षणी कोण माणूस कुठे असेल, तिथून तो कुठे फेकला जाईल आणि कुठल्या ठिकाणी असलेला माणूस एकदम कुठे राजसिंहासनी जाऊन बसेल हे सांगता येत नाही. रावाचा रंक करणे आणि रंकाचा राव करणं हा नियतीचा आवडता खेळ असतो म्हणतात. पण आम्हा सर्वसामान्य माणसांना हे दाखवून देण्यासाठी देवाला स्वत: अवतार घेऊन ते समजावून द्यावं लागलं आहे. ते सुद्धा तब्बल दहा वेळा. त्यातलाच एक अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र! दशरथ राजाच्या निधनानंतर रामाला भेटायला आलेल्या भरताला समजावून सांगताना राम हेच सांगतो, की
‘क्षणिक तेवि आहे बाळा मेळ माणसांचा’
सगळं काही आयुष्यात सुरळीत सुरू असताना एखादाच क्षण असा येतो की सारं चित्रच पालटतं. एखाद्याचा उत्कर्षावर उत्कर्ष होईल असं वाटत असताना एकाएकी तो माणूस रसातळाला जाऊन पोहोचतो आणि ज्याचं कुठे नकाशात अस्तित्वच नसतं तो एकाएकी राज्यावर बसतो. यासारखा विरोधाभास दुसरा कुठला असेल बरं? हातातोंडाशी आलेला घास आयत्यावेळी मातीत पडतो किंवा हातावर ओंजळीत आलेला प्रसाद एकाएकी दुसऱ्याच्या चोचीत जातो. दैव दैव म्हणतात ते हेच! आणि हे दैव नक्की काय करेल हे आजवर साक्षात परमेश्वराला देखील सांगता आलेलं नाही. अनेक दगडांना ठेचाळत, अनेक खाचखळग्यातून येत जेंव्हा नदी समतळ जमिनीवर येते तेव्हा तिला खोली प्राप्त झालेली असते. तिच्याकडे भरपूर पाणी असतं. आणि तिच्या प्रत्येक थेंबाथेंबाला ठेचा खाण्याचे, आहत होण्याचे, टक्करण्याचे आणि छिन्नविछिन्न होण्याचे असंख्य अनुभव आलेले असतात. म्हणून की काय तिची रुंदी आणि खोली वाढतच जाते आणि आवाज आणि वेग मात्र संथ आणि खोलवर होत जातो. आयुष्यात शांतपणे काही कठोर निर्णय हे घ्यावे लागतात. त्याचे परिणाम खूप मोठ्या कालावधीनंतर दिसून येतात. आज घेतलेल्या कडू वाटणाऱ्या निर्णयांची योग्य ती गोड फळं भविष्यात बऱ्याच वर्षांनी तुम्हाला चाखायला मिळणार असतात. म्हणूनच असे कठोर आणि कडू निर्णय घेताना त्या वेळेला मानसिक बळ असावं लागतं आणि सर्वात जास्त शक्ती असावी लागते ती लोकापवाद ऐकूनही निश्चल राहण्याची. आणि तेव्हाच शांतपणे सांगता येतं.
नको आंसू ढाळू आता पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा
नात्याने माता कैकयीला दोष दिला, आणि ना आपल्या वडिलांना. जे काही घडलं ते घडणारच होतं. तो आपल्या पूर्वसंचिताचाच भाग होता म्हणून निरासक्तपणे स्वीकारलं. ते सुद्धा नवविवाहित असताना. आणि खरी कमाल तर त्या सीतामाईची. जिच्या पावलाला कधीही जमिनीवरची मातीही लागली नसेल अशी ती राजकन्या, वल्कलं नेसून खुशाल आपल्या पतीच्या बरोबर अरण्यात जाती झाली. तिला काही दु:खं जाणवत नसतील? पण तीही या सगळ्याच्या पार पोचली होती त्याचं कारणच होतं की सत्सहवासाने व्यक्ती शहाणी होत असते. एकदा मोहाचा त्याग केला की मग कनक आणि सत्ता काहीही असो त्याच्याकडे पुन्हा म्हणून वळून पाहायचं नाही हे यातून खरंच घेण्यासारखं आहे.
ज्याच्यासाठी हे राजसिंहासन त्याच्या मातेने मागितलं होतं, तो भरतसुद्धा ते स्वीकारायला तयार नव्हता. तो प्रेमाने आणि आदराने ती सत्ता रामरायाच्या हाती सोपवण्यासाठी आला होता. पण पितृवचन पाळायचं आणि एकदा सोडलेला मोह परत करायचा नाही हा दृढनिश्चय त्यांचा होता. म्हणून घडलेल्या सर्व दु:खद गोष्टींविषयी तितक्या त्रयस्थपणे ते बोलू शकले. रामायण नंतर कित्येक वर्षांनी घडलेल्या महाभारतात भगवान कृष्णाने कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषुकदाचन हा जो निष्काम कर्मयोग सांगितला होता त्याची बीजं खरंतर रामायणातच सापडतात ती अशी. म्हणून आयुष्यातल्या एखाद्या हताश क्षणी रामरायाचे हे बोल आठवावेत. गीतरामायणातलं हे गाणं जरूर ऐकावं. ते आपल्याला हताश बसणं शिकवत नाही, तर शांतपणे आपलं कर्म करणं शिकवतं. आणि सततच्या अपेक्षा संपून जेव्हा निष्काम कर्मयोग सुरू होतो तिथेच खरं तर उत्कर्ष सुरू होत असतो. मानवाच्या पुत्राची ही मर्यादा नाही तर कर्तव्य आहे हे कळू लागतं.
- अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु