For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक आठवड्यात ‘मोठे’ काहीतरी घडणार

06:55 AM Jun 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
एक आठवड्यात ‘मोठे’ काहीतरी घडणार
Advertisement

ट्रम्प यांचा इशारा, शरणागतीस इराणचा स्पष्ट नकार, संघर्षाचे रुपांतर युद्धात होण्याची चिन्हे

Advertisement

वृत्तसंस्था / जेरुसलेम, तेहरान

इस्रायल आणि इराण यांच्यातील सशस्त्र संघर्ष आता चिघळला असून या संघर्षात अमेरिकेने मधे पडू नये, असा इशारा इराणने दिला आहे. तर इराणने आपला अणुबाँब बनविण्याचा हेका सोडला नाही, तर येत्या एका आठवड्यात काहीतरी ‘मोठे’ घडणार आहे, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक उग्र स्वरुप धारण करण्याची शक्यता आता निर्माण होताना दिसून येत आहे.

Advertisement

पुन्हा एकमेकांवर हल्ले, इशारे

अमेरिका इस्रायलच्या बाजूने संघर्षात उतरल्यास मोठे युद्ध होईल, अशी धमकीही इराणचे नेते अली खमेनी यांनी दिली आहे. बुधवारी संघर्षाच्या सातव्या दिवशी इस्रायलने पुन्हा इराणच्या लष्करी आस्थापनांवर हल्ले चढविले आहेत. प्रत्युत्तरात इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली असून त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष अधिकच भडकला आहे. दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे पेले जात आहेत.

मध्यरात्रीनंतर प्रचंड हल्ले 

बुधवारच्या मध्यरात्रीनंतर दिवस उजाडेपर्यंत इस्रायलच्या विमानांनी आणि क्षेपणास्त्रांनी इराणच्या लष्करी आस्थापनांवर अचूक हल्ले चढविले आहेत. इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. इस्रायलविरोधात स्वनातीत (सुपरसॉनिक) क्षेपणास्त्रे डागली जात आहेत, असे इराणचे म्हणणे आहे. मात्र, इराणचा प्रत्येक हल्ला आम्ही निकामी केला आहे, असे प्रतिपादन इस्रायलने केले आहे.

एक आठवड्यात मोठे घडणार

इराणने आपला अणुबाँब करण्याचा कार्यक्रम सोडला नाही आणि आपला हट्टाग्रह पुढे चालविला, तर येत्या एका आठवड्यात काहीतरी ‘मोठे’ घडू शकते, असा इशाराही अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिका इराणवर थेट हल्ला करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. आणखी काही दिवसांमध्ये स्थिती अधिक स्पष्ट होईल, असे या संदर्भात बोलले जात आहे.

इराणवर अमेरिका हल्ला करणार काय...

कॅनडातील जी-8 परिषदे अर्धवट सोडून अमेरिकेला परतलेल्या डोनाल्ड ट्रंप यांनी बुधवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसच्या परिसरात पत्रकार परिषद घेतली. मात्र, अमेरिका इराणवर हल्ला करणार का, या प्रश्नाचे थेट उत्तर त्यांनी दिले नाही. कदाचित अमेरिका स्वत:हून इराणवर हल्ला करणार नाही. तथापि, इराणने शरणागतीची घोषणा केली पाहिजे आणि आपला अणुकार्यक्रम गुंडाळला पाहिजे, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. इराणला अणुबाँब कधीही बनवू दिला जाणार नाही, हा अमेरिकेचा निर्धार असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. इराणपाशी वायुसंरक्षण व्यवस्था नाही. त्यामुळे त्या देशावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला झाल्यास तो देश दुर्बल होऊ शकतो. त्यामुळे त्या देशाने आता अधिक ताणू नये. आपला अणुबाँब बनविण्याचा कार्यक्रम त्याने सोडून द्यावा. तसेच अमेरिकेने जो प्रस्ताव समोर ठेवला आहे, तो मान्य करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

इस्रायलच्या हल्ल्यांना पाठिंबा

इस्रायलने इराणविरोधात जे हल्ले चालविले आहेत, त्यांना ट्रंप यांनी पाठिंबा घोषित केला आहे. इराणला अणुबाँब बनविण्यापासून रोखले जाणे आवश्यक आहे त्यामुळे इस्रायलची कृती समर्थनीय ठरते. इराणचा अणुबाँब बनविण्याचा कार्यक्रम हाताबाहेर गेल्यास साऱ्या जगाला धोका निर्माण होऊ शकतो, अशा अर्थाचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

इस्रायलच्या हल्ल्यात इराणची हानी

बुधवारी इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र साठ्यावर हल्ला केला आहे. तसेच इराणच्या काही तेलक्षेत्रांनाही लक्ष्य करण्यात आले असून इराणची आर्थिक हानी करण्यावर इस्रायलचा भर आहे, अशी घोषणा इस्रायलकडून करण्यात आली. आमच्या हल्ल्यांमुळे इराणच्या अणुबाँब बनविण्याच्या कार्यक्रमाला मोठा धक्का पोहचला आहे. युरेनियम संपृक्त करण्याची इराणची क्षमता दुर्बल करण्यात आम्हाला यश आले आहे, अशी माहितीही इस्रायलच्या प्रवक्त्याने दिली.

इराणकडून प्रतिदावा

इराणने इस्रायलवर डागलेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलच्या सेना मुख्यालयाची मोठी हानी झाल्याचा प्रतिदावा इराणकडून करण्यात आला. इस्रायलने हल्ले थांबविले नाहीत, तर त्याच्या विरोधात फतड क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात येईल. हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्थेला तोडण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादनही इराणकडून करण्यात आले आहे. मात्र, दोन्ही देशांनी केलेली प्रतिपादने अतिरंजित असू शकतात, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.

तेहरानवर पुन्हा मोठा हल्ला

बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात इराणची अनेक लष्करी आस्थापने उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, असे प्रतिपादन इस्रायलकडून करण्यात आले आहे. इराणचे काही अधिकारीही मारले गेले आहेत.

सशस्त्र संघर्षात दिवसभरात...

ड इराणने अणुबाँब बनविण्याचा हट्ट सोडावा अशी ट्रम्प यांची पुन्हा मागणी

ड इस्रायलचे इराणच्या लष्करी आस्थापनांवर पुन्हा हल्ले, इराणची मोठी हानी

ड इराणककडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, निकामी केल्याचे इस्रायलचे म्हणणे

Advertisement
Tags :

.