For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुछ तो लोग कहेंगे...

06:44 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुछ तो लोग कहेंगे
Advertisement

सत्य असत्यासी। मन केले ग्वाही।

Advertisement

मानियले नाही। बहुमता?

संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी हे म्हणून ठेवलेलं आहे. आणि हे अगदी साहजिक आहे. कोणतीही गोष्ट ही किती लोक करतात किंवा करत नाहीत यावरून योग्य किंवा अयोग्य ठरत नसते. उदाहरणार्थ लाख लोक दारू पितात म्हणून दारू उत्तम ठरत नाही. हे बऱ्याच लोकांना कळत नाही. कळलं तरी वळत तर नाहीच. पण कसं कोण जाणे काही व्यक्तींना ते कळतं. भलेही समाजाच्या दृष्टीने त्या वेड्यातही जमा होत असतील पण

Advertisement

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना

छोडो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना

किशोरदांच्या सदाबहार सुरातलं हे अत्यंत वैचारिक चिंतनशील गीत. खरोखरच लोक काय म्हणतील या भीतीनं आपण आयुष्यात चांगल्या गोष्टी करायलाच घाबरतो. साधं पडल्यानंतरही आपण स्वत:ला किती लागलंय यापेक्षा आधी कितीजणांनी ते पाहिलंय हे बघतो. मोठी गंमत आहे म्हणायची. हे सगळं शांतपणे स्वीकारून बसलेले लोक कुछ तो लोग कहेंगे म्हणून पुढे होतात. पण आपण अख्ख्या जगाला विचारत नाही हे ठणकावून सांगायला काहींना फार आवडतं. त्यामुळे ते एक सणसणीत आरोळी ठोकून सांगतात.

याहू???

चाहे कोई मुझे जंगली कहें

कहने दो जी कहता रहे

हम प्यार के तूफानों में गिरे हैं

हम क्या करें?

म्हणेना का कुणीही काहीही! आम्ही बुवा प्रेमाच्या तडाख्यात सापडलोय हे नक्की. त्यामुळे कोण काय म्हणतं याची आम्हाला फिकीर नाही. विशेषत: तरुण वयात हे असं जगाला शिंक्यावर ठेवायची हौस फार असते. अर्थात ही हौस सगळ्यांनाच परवडते असं नाही. पुरुषांना सगळंच परवडतं. स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी अडचणीच फार असतात. त्यातल्या त्यात सासुरवाशिणीची तऱ्हा तर फारच कठीण. तिला काही गोष्टी सहनही होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत. मग ती आपल्या जुन्या मैतराला विनवते.

नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक

भर बाजारी करिसी खुणा

करु नको पुन्हा हा गुन्हा.

कारण त्यातही तिला सर्वात जास्त भीती वाटते ती म्हणजे

द्वाड सासरचा गाव माझं जाईल नाव

तू रे माहेरचा मैतर जुना

सासरच्या गावचे लोक काय म्हणतील? माझं नाव खराब होईल. अरे बापरे बाप..नकोच तुझ्याशी बोलणं. म्हणजे मनातून अगदी हवं जरी असलं तरी शेवटी लोक काय म्हणतील हे आहेच. त्यामुळे समोरच्याने काहीही मागावं आणि देणारीने ते द्यावं इतकं ते सोपं नसतं. मग ती म्हणते

सोना ले जा रे चाँदी ले जा रे

पैसा ले जा रे, दिल कैसे दे दूँ मैं जोगी?

के बड़ी बदनामी होगी

हो..ती त्याला आपलं मन देऊन बसली म्हणजे गावभर चर्चा आणि बदनामी ठरलेलीच. मग असं आपलं नाव गेलेलं कुणाला चालेल बरं? पुन्हा एकदा क्या कहेंगे लोग? ही गीतं मंगेशकर भगिनींच्या स्वरांच्या स्पर्शाने सदाबहार झाली आहेत आणि आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. नको मारूस हाक आहे एव्हरग्रीन आशाताईंचं आणि दुसरं आहे परम आदरणीय लतादीदींनी गायलेलं.

लोग कहते है पागल मैं ये भी ना जानूँ

दिल लुटाया है मैंने अब किसी की न मानूँ

हा एक वेगळाच दृष्टिकोन! लोक मला वेडा म्हणतात पण मी तर प्रेमात पडलो आहे. कुणीही काहीही म्हणा. कोणीही मला अडवू शकत नाही. मी कुणाचं ऐकणारही नाही. हे बाकी भारी असतं. राहुल जैन यांच्या स्वरातील हे गाणं स्लो रिवर्ब व्हर्जनमध्ये ऐकायला आणखीनच छान वाटतं.

लोग कहते है की मोहब्बत में असर होता है.

कौन से शहर में होता है किधर होता है?

मुसहफी गुलाम हमदानी असं म्हणून गेले खरे? पण त्यांनी लोकांना हे विचारलेले प्रश्न अजूनही तसेच आहेत. कारण मोहब्बतमध्ये असलेला असर असे काही चटके देऊन जातो की हात आयुष्यभरासाठी पोळतात. हा प्रश्न खरं तर उपरोधीक टोनमध्ये आहे. एकीकडे लोक काय म्हणतील या भीतीनं आयुष्यभर कितीतरी गोष्टी मनातल्या मनात कढत राहणारे किंवा कित्येक गोष्टी सोडून देणारे लोक असतात. तर दुसरीकडे लोक काहीही म्हणोत पण आपलं म्हणणं न सोडणारेही असतात. खरं तर लोकनिंदेची भीती नसतेच माणसाला. त्यापेक्षा जास्त भीती असते ती आपल्या माणसाला काय वाटेल? त्यांची काय समजूत होईल याची. त्यामुळे

लोग कहते हैं मैं शराबी हूँ

तुमने भी शायद यहीं सोच लिया

असा नकळत प्रश्न विचारून खात्री करून घ्यावी लागते. द अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं किशोरदांच्या गायनाभिनयाचंही अत्युत्कृष्ट उदाहरण म्हणावं लागेल. अशासाठी की डोळे मिटून ऐकलं तर अमिताभच गातोय असं वाटतं आणि टोन इतका शराबी आहे की बाप रे बाप! उगाच नाही लोक त्यांना बाप माणूस म्हणत! आणि हे म्हणणारे लोक मात्र शहाणे असतात. आशाताईंची एक नितांत शांत, ऐकत राहावी वाटणारी गझल आहे.

लोग कहते हैं के अजनबी तुम हो

अजनबी मेरी जिंदगी तुम हो..

वाह...किती सुंदर... लोकांना अगदी अनोळखी वाटणाऱ्या व्यक्तीला तू म्हणजे माझं आयुष्य आहेस. माझं जीवन तुझ्यामुळे आहे असं म्हणणं दोन ओळीत कवितेला किती मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतं ना! संगीत हे किती सूक्ष्म पातळीवर जाऊन कार्यरत होत असतं. लोग कहते हैं मधला तो नि:श्वाससा वाटणारा स्वर आणि अजनबीमधला अनोळखीपणाची स्पष्ट जाणीव करून देणारा हलक्या हाताने सोडून दिलेला स्वर. पाण्याच्या प्रवाहात सोडलेल्या दिव्यांप्रमाणे दिसतात. लाजवाब. इथे ‘लोक’ हे पात्र अगदी ठाशीव ठळक येतं. आणि एकाएकी पुढच्या ओळीत त्याला झर्रकन गौणत्त्वही येतं. तसं आपण काहीही म्हटलं तरी लोक बऱ्याचदा महत्त्वाचे असतात. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक पण ते असतात. त्यांच्याशी मैत्र नाही जुळले तर मग

गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी

असं म्हणावं लागतं. आणि जेव्हा लोकांच्या शेऱ्यापलीकडे माणूस निघून जातो तेव्हा

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

असं शांतपणे म्हणता येतं.

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.