भाजपातील काहींना आता पर्रीकरांची अॅलर्जी : उत्पल
पणजी महापालिका निवडणुकीत उतरवणार स्वतंत्र गट
पणजी : मार्च 2026 मध्ये होणाऱ्या पणजी महापालिका निवडणुकीत आपला स्वतंत्र गट उतरविणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पक्षातील काही लोकांना आणखी पर्रीकर नको आहेत, असे एकंदरीत चित्र दिसून येते. याबाबत त्यांनी खंत व्यक्त करून अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे उत्पल पर्रीकर हे पुत्र आहेत. ते पुढे म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत पणजी मतदारसंघातून रिंगणात होतो. त्यावेळी बऱ्यापैकी म्हणजे 6000 पेक्षा जास्त मते मिळवली होती. तेव्हा पक्ष आपला विचार करेल अशी आशा होती. परंतु पक्षाने दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षातीलच काही जणांना आता पर्रीकरांची अॅलर्जी आहे. त्यांना पर्रीकर नको असा टोमणाही उत्पल यांनी मारला.
वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता
पणजीतील अनेक समस्या, बेकायदा कृत्ये याबाबत आपण आवाज उठविलेला आहे. पण जर पक्षाला पर्याय द्यायचा नसेल किंवा विचारच करायचा नसेल तर आपला नाईलाज आहे. म्हणून तर पणजी महापालिका निवडणुकीत उतरणे भाग पडले आहे. गुन्हेगारीत हात असणारे लोकच जर विधानसभेत बसून कायदे करतात तर जनतेने काय करावे ते सांगावे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाढत्या गुन्हेगारीबाबत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.