आनंदनगरमधील विविध समस्या त्वरित सोडवा
आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे महापौरांना निवेदन
बेळगाव : आनंदनगर येथील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात आनंदनगर रहिवासी संघटनेच्यावतीने नुकतीच महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन देण्यात आले आहे. निवेदनाचा स्वीकार करून समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन महापौरांनी दिले आहे. आनंदनगरमधील क्रॉस नं. 1, 2 व 3 मधील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. 24 तास पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्यासाठी एलअॅण्डटीकडून खोदकाम करण्यात आले आहे. त्यानंतर चरी व्यवस्थितरित्या बुजविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी मोठमोठे खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. इतकेच नव्हेतर अनेकजण पडून जखमीदेखील होत आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवून चांगल्याप्रकारे डांबरीकरण करण्यात यावे.
क्रॉस नं. 1 वरील श्री शिव मंदिरकडील बाजूला गटार बांधण्यात आलेली नाही. याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही काम झालेले नाही. आनंदनगरमधील नाल्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने यंदा पावसाळ्यात नाल्यातून वाहणारे घाण पाणी अनेकांच्या घरात शिरले. त्यामुळे याचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागला. विहिरीमध्ये सांडपाणी झिरपत असल्याने विहिरींचे पाणी दूषित बनले आहे. घरोघरी कचरा उचल करण्यासाठी येणारी घंटागाडी चार ते पाच दिवस येत नाही. यापूर्वीचे कचरा उचल करणारे कर्मचारी सौजन्याने वागत होते. मात्र आताचे कामगार अरेरावी करत आहेत, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.
रस्त्याच्या झाडलोटीचे कामही व्यवस्थितरित्या होत नाही. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांचा चावा घेतला जात आहे. मोटारसायकल चालकांचा कुत्र्यांच्या कळपाकडून पाठलाग केला जात आहे. ही बाब गांभीर्याने घेत कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. आनंदनगर-अनगोळ मुख्य रस्त्यावर क्रॉस नं. 3 समोर रस्त्यामध्येच इलेक्ट्रीक खांब आहेत. त्याच्या बाजूला काही गॅरेजमालक दुरुस्तीसाठी आलेली वाहने पार्क करीत आहेत. अनेक दिवसांपासून ती वाहने तशीच पडून असल्याने मुख्य रस्त्यावर अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हा अत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने कोणत्याहीवेळी अपघात होण्याचा संभव आहे. अशा विविध तक्रारींचा पाढा महापौरांसमोर वाचण्यात आला.