For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बळ्ळारी नाल्यासंबंधित समस्या सोडवा

01:06 PM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
बळ्ळारी नाल्यासंबंधित समस्या सोडवा
Advertisement

आमदार आसिफ सेठ यांच्याकडून बळ्ळारी नाला परिसराची पाहणी 

Advertisement

बेळगाव : बेळगाव शेतकरी संघटनेने महामार्ग आणि बळ्ळारी नाल्याशीसंबंधित समस्या आमदार आसिफ सेठ यांच्यासमोर मांडल्यानंतर आमदार सेठ यांनी बुधवारी प्रत्यक्ष बळ्ळारी नाल्याची व परिसराची पाहणी केली. शेतकरी संघटनेचे नारायण सावंत यांनी बळ्ळारी नाल्याबाबतच्या समस्या स्पष्ट केल्या. हायवे सर्व्हिस रस्त्यावरील ड्रेनेज पाईपवर बांधकाम सुरू झाल्याने शेतवाडीत पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

यावेळी आमदार सेठ यांनी ड्रेनेज पाईप बसवूनच बांधकाम करा व नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवा, अशी सूचना केली. हायवेवरील बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्यावर सर्व्हिस रोडवर ब्रिज नसल्याने पावसाळ्यात पायी जाणे धोकादायक ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीच्या बांधकामाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच दोन्ही नाल्यांवर फ्लायओव्हर बांधून रस्ता पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

Advertisement

लेंडी नाला, समर्थनगर ते हायवेपर्यंत नाल्याची रुंदी आणि खोली वाढवावी, डिसेंबरपासून या कामाला सुरुवात करावी, नाल्यावर एका बाजूला बफर झोन तयार करून पावसाळ्यात सफाई सुलभ करावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. त्याचप्रमाणे समर्थनगरपासून हायवेकडे जाणारा रस्ता डांबरीकरण केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, याकडेही लक्ष वेधण्यात आले. समर्थनगर ते हरिकाका कंपाऊंडला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केल्यास वाहतूक सुलभ होऊन नागरिकांची सोय होईल, असेही सावंत यांनी आमदारांना सांगितले.

येळ्ळूर रोड ते मुचंडी या दरम्यान बळ्ळारी नाला दोन्ही बाजूंनी तुंबत असून जवळजवळ 5 हजार एकर शेतीला फटका बसत आहे. तसेच मुचंडी गावाजवळ जेथे रेल्वेलाईन आहे तेथे उंचवटा असून तिथून येणाऱ्या सांडपाण्यामुळे शेतीला अडथळा निर्माण होत आहे. याची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली. सततच्या तुंबणाऱ्या पाण्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. अशा शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी.

बळ्ळारी नाला आणि या परिसरातील समस्यांबाबत एक तज्ञ समिती नेमावी, ज्यांना जमिनीचा पोत आणि दर्जा समजतो. तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्याला आर्थिक नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकऱ्याला पुन्हा जमीन कसण्यासाठीची मदत म्हणून 70 हजार रुपये अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी करण्यात आली. आमदारांनी या सर्व समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रमेश मोदगेकर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.