For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समस्या सोडवा; अन्यथा धरणे आंदोलन

12:46 PM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
समस्या सोडवा  अन्यथा धरणे आंदोलन
Advertisement

कामगार दिनावर बहिष्कार घालण्याचा इशारा : सफाई कर्मचारी कावलु समितीतर्फे मनपा अधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी महानगरपालिका आयुक्तांबरोबर बैठक झाली. त्यानंतर निवेदन देण्यात आले. त्यावेळी समस्या सोडविण्याबाबत आश्वासन देण्यात आले. मात्र दीड महिना उलटला तरी त्या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत. आता आम्ही शेवटचे निवेदन देत आहोत, त्यानंतर महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन छेडू, कामगार दिनावर बहिष्कार घालण्याचा इशाराही सफाई कर्मचारी कावलु समितीतर्फे महानगरपालिकेला देण्यात आला आहे. दीड वर्षापूर्वी 100 सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याबाबत आदेश देण्यात आला. मात्र याबाबत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी 154 कामगारांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्यात आले. मात्र त्यामधील काही कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन देण्यात आले नाही. त्यांचे वेतन तातडीने द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सफाई कर्मचाऱ्यांना क्वॉर्टर्स देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र अजून त्याबाबतचे आदेशपत्र दिले नाही. आनंदवाडी येथे रमाबाई आंबेडकर हॉलमध्ये ग्रंथालय मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी 38 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. मात्र त्या कामाला अद्याप चालना देण्यात आली नाही. सफाई कर्मचाऱ्यांना सकाळच्यावेळी नाष्टा द्यावा, वाल्मिकी भवनाच्या बांधकामास परवानगी देऊनही काम सुरू नाही. तेव्हा तातडीने ते काम सुरू करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. या सर्व समस्या तातडीने सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मनपा उपायुक्त उदयकुमार तळवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, जनरल सेक्रेटरी विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, षण्मुख आदेंद्र, मोहन साके, विठ्ठल तळवार, सुभाष घराणी, संभाजी कोलकार यांच्यासह इतर संघटनांचे पदाधिकारी आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.