महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक व्यापारावर संक्रांत आणणारे हल्ले

06:23 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुएजच्या कालव्यात एक भलेमोठे जहाज अडकून पडल्यानंतर आठवडाभर झालेल्या चक्काजाममुळे जागतिक व्यापारात 60 अब्ज डालर्सचे नुकसान झाले होते. तर आता इस्त्रायलचा बदला घेण्यासाठी येमेनमधील इराण समर्थित हौथी बंडखोरांनी व्यापारी जहाजांना आपले लक्ष्य बनविले असून तांबड्या समुद्रातून सुएज कालव्यामार्गे युरोपला जाणारी जहाजे गेल्या दोन महिन्यांपासून विस्कळीत झाल्याने शेकडो अब्ज डॉलर्सचे नुकसान झालेले आहे.

Advertisement

इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध पेटल्यानंतर जागतिक पटलावर बरीच उलथापालथ सुरु आहे. या युद्धामुळे इस्लामी जगतात पहिल्यांदा उभी फूट दिसून आली. सौदी अरेबिया आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांनी इस्त्रायल विरोधात कारवाई करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. इराण मात्र या युद्धामुळे बैचैन असून लेबननमधील हैजबोल्ला, येमेनमधील हौथी या दहशतवादी संघटनांमार्फत इस्त्रायलविरोधातील हमासला रसद पुरविण्याबरोबरच तांबड्या समुद्रातील व्यापारी बोटींवर हल्ले करून जगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Advertisement

आशिया खंडावरील देशातून युरोपात होणाऱ्या निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय जहाजे हिंदी महासागरातून बाब अल् मंडाबच्या समुद्रधुनीतून तांबड्या समुद्रीमार्गे सुएझ कालव्यातून मालवाहतूक केल्याने 5 हजार किलोमीटरचे अंतर कमी होऊन सात दिवसांची बचत होते. मालवाहतूकीत

वेळेची बचत झाल्याने बाजारपेठेतील महागाई नियंत्रित राहते. यासाठीच युरोप आणि मध्यपूर्वेकडून येणारी जहाजे याच मार्गाचा वापर करतात. तांबड्या समुद्रातून वर्षाकाठी 17 हजार जहाजे मार्गक्रमण करत असतात.

आता या मार्गावरील जहाज वाहतूक वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे संकटात सापडली असून केप ऑफ गुड होपला अर्थात आफ्रिकेला वळसा घालून युरोपला मालवाहतूक करत आहे.

तांबड्या समुद्रातून साधारणत: जागतिक स्तरावरील 12 टक्के व्यापार हाताळला जात आहे. वर्षाकाठी 17 हजार जहाजे एक महापद्म डॉलर्सचा व्यापार हाताळतात. आशिया आणि मध्यपूर्वेकडील माल युरोपला पोहोचविण्याचे काम तांबड्या समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या व्यापारी जहाजाकडून होत असते. आता या कंपन्यांनी हल्ल्याच्या भीतीने आपली जहाजे आफ्रिकेला वळसा घालणाऱ्या मार्गावरून हाकण्यास सुरुवात केलेली आहे. यामुळे युरोपियन बाजारपेठेबरोबर जागतिक महागाई कमी होण्याची चिन्हे धूसर बनलेली आहे. हौथीच्या वाढत्या उपद्रवामुळे आशियातून येणारे सुटे भाग व कच्चा माल पुरवठ्यात अडचण निर्माण झालेली आहे. परिणामी सुट्या भागाअभावी एलॉन मस्क यांनी आपल्या युरोपातील इलेक्ट्रिक गाड्या बनविण्याचा कारखाना काही काळासाठी बंद केलेला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनविणाऱ्या युरोपातील कंपन्यांना चांगलाच फटका बसलेला आहे. मध्यपूर्व आशियातून होणारा इंधन पुरवठा महागल्याने त्याचा विपरीत परिणाम महागाईवर होत आहे.

हौथी बंडखोरांच्या उपद्रवावर उपाय म्हणून अमेरिका आणि ब्रिटनने तांबड्या समुद्रात आपल्या नौदल आणि वायूदलाला सक्रिय केलेले आहे. या संयुक्त कारवाईत हौथीच्या इराक आणि येमेनमधील तळावर हल्ले केलेले आहेत.  भारताच्या नौदलाने यापूर्वीच बाब अल् मंदाब खाडीत चाललेल्या सोमालियातील समुद्रीचाच्यांच्या उपद्रवावर उपाय योजना सुरु केलेली होती. आता हौथीच्या हल्ल्यांपासून व्यापारी जहाजांच्या मदतीलाही भारतीय नौदल तत्परतेने धाव घेत आहे. गेल्या दोन महिन्यात चार अपहृत जहाजे हौथी बंडखोरांकडून सुरक्षीतपणे मुक्त केलेली आहे. आता यात अमेरिका आणि ब्रिटनच्या नौदलाचा समावेश झालेला असून व्यापारी जहाजे पुन्हा एकदा तांबड्या समुद्रातून मार्गक्रमण करणार आहेत.

दोन महिन्यांपासून मालवाहू आणि इंधनवाहू जहाजांवर द्रोण, क्षेपणास्त्र आणि अग्निबाणाने हल्ले करून या जहाजांवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न सुरु झाल्यापासून तांबड्या समुद्रातून जहाजांची ये-जा ठप्प झाल्याने शेकडो अब्जांचे नुकसान होत असून त्याचा फटका जगभरातील सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हौथी बंडखोरांना आंतरराष्ट्रीय जलमार्गांच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचा  आदर करण्याचे आवाहन केलेले आहे. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही हौथीच्या उपद्रवात मोठा फरक पडलेला अजून तरी दिसत नाही.

व्यापार जगतावर कोसळलेल्या संकटावर मात करण्यासाठी भारत सरकारने आपल्या नौदलाला सतर्क ठेवलेले आहे. तांबडा समुद्र हा हिंद महासागराला भूमध्य समुद्राशी जोडणारा एक महत्त्वाचा जागतिक जलमार्ग असल्याने भारताच्या परराष्ट्र धोरणात त्याचे भू राजकीय महत्त्व प्रचंड आहे. यासाठीच डिसेंबर 2020 पासून भारतीय नौदलाच्या जहाजांनी तांबड्या समुद्रात समुद्रीचाच्यांकडून करण्यात आलेल्या 17 जहाजांच्या अपहराणांच्या घटनांना प्रथम प्रतिसाद म्हणून काम केले आहे. नौदलाने आपले आयएनएस सुमित्रा जहाज या परिसरात तैनात केलेले असून तैनातीनंतर अवघ्या 36 तासांच्या आत दोन जहाजांवर हल्ला झाल्याचे संदेश मिळताच या अपहृत जहाजांची सुटका केली.

भारतीय नौदलाच्या तत्परतेमुळे तांबड्या समुद्रातील संकटाचा भारताच्या आयात निर्यातीवर कोणताही परिणाम झाला नसला तरी बहुतांश जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा घालून यावे लागते. यामुळे जागतिक स्तरावर बदललेल्या प्रवासाचे अंतर 40 टक्क्यांनी वाढलेले असून त्याचे दुष्परिणाम महागाईच्या स्वरुपात सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत.

प्रशांत कामत 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article