सैनिकांनो, मनसोक्त दाढी वाढवा !
बहुतेक सर्व देशांमध्ये सैनिकांच्या दाढी वाढविण्यावर प्रतिबंध आहे. त्यामुळे सैनिक म्हटला की, आपल्या डोळ्यांसमोर चकाचक दाढी केलेलाच व्यक्ती उभा राहतो. दाढीप्रमाणे सैनिकांना डोक्यावरचे केसही वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात वाढविण्याची मुभा नसते. भारतीय सैन्यात (शीख सैनिकांचा अपवाद वगळून) हा नियम आहे. ब्रिटीश सैन्यदलांमध्ये तर गेल्या 100 वर्षांपासून हा नियम आहे.
मात्र, आता ब्रिटनने आपल्या भूसेनेसाठी हा नियम काढून टाकला आहे. त्यामुळे ब्रिटीश भूसेनेत (आर्मी) काम करणारे सैनिक आणि अधिकारी आता दाढी वाढवू शकणार आहेत. या निर्णयाला अद्याप ब्रिटनचे सम्राट किंग चार्ल्स यांच्याकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. मात्र, ही मान्यता हा केवळ उपचार असल्याने लवकरच या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना, त्यांची इच्छा असल्यास दाढी वाढविता येणार आहे. अर्थात, ही मुभा मिळविण्यासाठी त्यांना एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे, असे ब्रिटीश भूसेनेने स्पष्ट केले आहे.
ही अट अशी आहे, की ज्या सैनिकांना किंवा अधिकाऱ्यांना दाढी वाढवायची आहे, त्यांनी ती पूर्णत: वाढविणे आवश्यक आहे. फ्रेंच कट किंवा अन्य कोणत्याही फॅशन प्रकारात मोडेल अशा प्रकारे दाढी वाढविता येणार नाही. तसेच ते आपल्या दाढीला कोणत्याही कृत्रिम रंगात रंगवू शकणार नाहीत. केसांचा नैसर्गिग रंग जो असेल तशीच दाढी असली पाहिजे. तसेच दाढी नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या दाढीचे नेहमी परीक्षण होत राहील आणि नियमांचे पालन केलेले नसल्याचे आढळल्यास त्यांना दाढी काढावी लागणार आहे.
दाढी न वाढविण्याचा नियम काढून टाकण्यासाठीचे महत्वाचे कारण म्हणजे ब्रिटनमधील युवकांमध्ये सैन्यात जाण्याचे आकर्षण कमी झाले आहे. त्यामुळे नवे गुणवान सैनिक आणि अधिकारी मिळणे पूर्वीइतके सहज राहिलेले नाही. युवकांना आकर्षित करुन घेण्यासाठी काही नियम शिथील करावे लागणार याची जाणीव तेथील सैनिकी अधिकाऱ्यांना झाल्याने त्यांनी दाढीसंबंधी नियमात परिवर्तन केले.