जम्मूतील चकमकीत जवान हुतात्मा
उधमपूर येथे सुरक्षा दलाचा दहशतवाद्यांशी संघर्ष
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मूतील उधमपूर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला. संघर्षामध्ये जखमी झालेल्या एका सैनिकाने शनिवारी सकाळी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या चकमकीत एका एसपीओसह दोन पोलीस जखमी झाले आहेत. दोडाच्या दुडू-बसंतगड आणि भदरवाह येथील सोजधर जंगलात शुक्रवारी रात्री सुरू झालेली ही चकमक शनिवारी दिवसभर सुरू होती. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) च्या संयुक्त पथकाने परिसरात शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान, तिथे लपलेल्या दोन-तीन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर संघर्ष झडला होता.
चकमकीच्या परिसरात रात्रभर कडक घेराव घातल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. ड्रोन, हवाई देखरेखीसाठी हेलिकॉप्टर आणि जमिनीवर स्निफर डॉगसह सुसज्ज असलेले सैन्य उधमपूर आणि दोडा या दोन्ही ठिकाणांहून दहशतवाद्यांचा शोध घेत होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरही सुरक्षा कडक करण्यात आली आहे. किश्तवाडमध्येही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांचा शोध सुरू
घटनेनंतर चकमकीच्या ठिकाणाभोवती रात्रभर कडक नाकाबंदी करण्यात आली होती. शनिवारी सकाळी संयुक्त शोधमोहीम पुन्हा सुरू झाली. जंगल परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय आहे. उधमपूर आणि दोडा या दोन्ही ठिकाणाहून ड्रोन आणि स्निफर डॉगसह सुसज्ज अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. मात्र, दहशतवाद्यांचा कोणताही मागमूस सापडला नाही.