मुलाच्या बारशाला आलेल्या सैनिकाने भावजयीचे केला होता खून
सैनिकाला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा
जमिनीच्या वादातून घडली घटना
सोलापूर
सांगोल्यातील उदनवाडी येथील बिरूदेव पांढरे हा मुलाच्या बारश्यानिमित्त सुट्टी काढून गावी आला होता. बिरुदेव हा कोहीमा नागाल्रॅण्ड येथे सैन्यात कार्यरत होता. गावी आल्यावर बिरुदेवाने आठ एकर जमिनीच्या वादातून चुलत भाऊ दत्तात्रय पांढरे आणि त्यांचे भाऊ जयवंत व अर्जून यांच्यावर बंदूक चालवली. त्यांत हे तिघे बचावले, पण बिरुदेवने बंदुकीत भरलेल्या दुसऱ्या बारने चुलत भावजय उज्वला पांढरे यांचा जीव घेतला. बिरुदेवला पंढरपूर न्यायालयाने या गुन्ह्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
उदनवाडी (ता. सांगोला) येथील प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांच्याकडील जमिन आरोपी बिरुदेवला घ्यायची होती. पण ही जमीन चुलत भाऊ दत्तात्रय, जयवंत व अर्जून यांनी घेतल्याने बिरुदेवच्या मनात राग होता. त्यासाठी दोघांनीही एकमेकांविरुद्ध सांगोला कोर्टात दिवाणी दावे दाखल केले होते.
बिरुदेव सैन्यात असल्याने त्याच्याकडे दोन बोअरची बंदूक होती. मुलाच्या बारश्यानिमित्त घरात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान १४ जुलै २०१४ ला सकाळी फिर्यादी दत्तात्रय पांढरे आणि त्यांचे भाऊ, भावजय शेतात गेल्यावर बिरुदेवसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी चुलत भावांनी लोखंडी पाईप, काठ्यांनी मारहाण केली. या भांडणाच्याभरात बिरुदेवने स्वतःच्या बंदुकीतून चुलत भावांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते दोघेही जखमी झाले. बिरुदेवने परत बार भरला आणि चुलत भावजय उज्वलाच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यामध्ये उज्वलाचा जागीच मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर बिरुदेव सहा महिने फरार होता. त्यानंतर एकदा गावात येऊन उसात लपून बसलेल्या बिरुदेवला पोलिसांनी पकडले. या गुन्ह्यात सरकारतर्फे डॉ. सारंगी वांगीकर यांनी युक्तीवाद केला. तर सांगोला पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी तपास केला होता.