किणी येथील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
कोल्हापूर :
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिह्यातील दुसरा प्रकल्प किणी (ता. हातकणंगले) येथे कार्यान्वित झाला असून या प्रकल्पातून 1216 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. जिह्यातील पहिला प्रकल्प हरोली (ता. शिरोळ) येथे यापूर्वीच कार्यान्वित झाला असून त्यातून 790 शेतक्रयांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे जिह्यात शेतीला दिवसा वीजपुरवठा मिळणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या 2006 झाली आहे.
राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून जिह्यातील दुसरा दोन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प किणी (ता. हातकणंगले) येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे महावितरणच्या 11 केव्ही भादोले व 11 केव्ही घुणकी या कृषी वाहिन्यांवर असलेल्या वाठार, किणी व घुणकी या गावांतील 1216 शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरु झाला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कोल्हापूर जिह्यात 53 ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता 170 मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 48 कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.
सौर प्रकल्प उभारणीत जिल्हा प्रशासनाचे सहकार्य
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत जिह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व भूमी अभिलेख कार्यालय यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.
सौर प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करा - महावितरण
वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरीता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. जिह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच या प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रकल्प सुरु झाल्या पासून पहिले तीन वर्षे पाच लाख अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी सबंधित ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.