थायलंडचा ‘ब्लॅक डायमंड’ पेरू कोल्हापुरात
कोल्हापूर :
थायलंड, सांगोला वाया कोल्हापूरात प्रथमच ब्लॅक डायमंड प्रजातीचा पेरु दाखल झाला. अकोला (वासुद) ता.सांगोला, जि. सोलापूर येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग आसबे यांनी थायलंडमधील या पेरुच्या प्रजातीचे महाराष्ट्रात उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. बुधवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच या पेरुची आवक झाली. येथील इस्माईल बागवान, मोहसीन बागवान यांच्या गाळामध्ये या पेरुची आवक झाली.
येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग आसबे नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करत असतात. त्यांनी वर्षभरापुर्वी थायलंडवरुन येथील ब्लॅक डायमंड या पेरुच्या प्रजातीची रोपे महाराष्ट्रात आणली होती. आपल्या शेतामध्ये त्यांनी या रोपाची लागवड केली. वर्षभरात त्यांना या रोपांपासून पेरुचे उत्पादनही मिळू लागले. या रोपांपासुन प्रथमच मिळालेले पेरु त्यांनी सर्वप्रथम कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणले. येथील बागवान यांच्या गाळा नं 2 येथे बुधवारी या ब्लॅक डायमंड पेरुचा लिलाव झाला. पेरु मार्केटमध्ये मंदी असतानाही 101 रुपये इतका उच्चांकी दर आसबे यांच्या नव्या प्रजातीच्या पेरुला मिळाला. लिलावावेळी नितीन सूर्यवंशी, तेजस डोके, संभाजी चिले, राजू शिंदे, धनाजी कुंभार आदी उपस्थित होते.
ब्लॅक डायमंड प्रजातीचा पेरु बाहेरुन व आतुन एकमद लाल आहे. तसेच या पेरुचे झाडही लाल रंगाचे आहे. पेरुमध्ये बियांचे प्रमाण कमी असून इतर पेरुंच्या तुलनेत ब्लॅक डायमंड पेरुची गोडी अधिक आहे. तसेच टिकवन क्षमताही उत्कृष्ट आहे. त्यामुळे बाजारपेठेत या पेरुला चांगली मागणी मिळेल असा विश्वास पेरु उत्पादक शेतकरी आसबे यांनी व्यक्त केला. काही दिवसांपुर्वी दक्षिण आफ्रीकेमधून हापूस आंब्याची आवक बाजार समितीमध्ये झाली होती. या आंब्यालाही ग्राहकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.