Solapur Politics: सोलापूरची ‘गोल्डन नगरसेविका’ श्रीदेवी फुलारे भाजपमध्ये; काँग्रेसला मोठा धक्का
महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का
सोलापूर : गोल्डन नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी रविवारी सकाळी सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुपारी सोलापुरातील विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लगेच भेट घेण्याची गोल्डन संधी फुलारे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वीच साधली. आ. देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने हा गोल्डन प्रसंग निर्माण झाला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होती.
फुलारे यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. दोन टर्म नगरसेविका असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्याउपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजप प्रवेश केल्यानंतर श्रीदेवी फुलारे यांनी विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत फुलारे हे भाजपमध्ये जाणार होते. परंतु त्या अगोदरच त्यांचे पारंपरिक विरोधक अंबादास करगुळे आणि माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर गेला.
सोलापूर महापालिकेच्या प्रभाग १५ मध्ये अनुसूचित जाती महिला हे आरक्षण असल्याने काँग्रेस पक्षाकडून श्रीदेवी फुलारे यांची बाट मोकळी होती, अशी चर्चा होती. पण यापूर्वीच वैष्णवी करगुळे हे भाजपमध्ये गेल्याने त्या ठिकाणी आता फुलारे हे सुद्धा भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे वैष्णवी करगुळे व श्रीदेवी फुलारे यांच्यात कोणाला भाजपची उमेदवारी मिळणार याची उत्सुकता निर्माण होत आहे. सोलापूर शहरात गोल्डन नगरसेविका म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेबी फुलारे यांनी दहा वर्ष नगरसेविका म्हणून कामकाज करताना त्यांनी मतदारांचे कायमच लक्ष वेधून घेतले होते.