Solapur : मोबाइल टाॅवरवर चढून तरुणाचे प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन!
५ तास थरार नाट्य; आश्वासनानंतर रात्री ८ वा. आंदोलन मागे घेण्यात आले.
कुर्डुवाडी वार्ताहर
आपले सरकार सेवा केंद्रांच्या दि.४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंजुरी देण्यात आलेल्या निर्णयामध्ये विसंगती असल्याची तक्रार करत संबंधित विविध आठ मागण्यांचे निवेदन देत न्यायासाठी सीएससी केंद्र चालक संतोष शंकर वाघमारे रा. म्हैसगाव ता. माढा यांनी कुर्डुवाडी येथील गीताबाईचा मळा येथील मोबाइल टाॅवरवर सुमारे २००फुट उंचीवर चढून दु.३.३० वा सुमारास आपले आत्महत्या आंदोलन सुरु केले. तब्बल ५ तास हे थरार नाट्य सुरु होते. अखेर करमाळा माढाचे आ.संजयमामा शिंदे,प्रांताधिकारी प्रियंका अंबेकर, तहसीलदार विनोद रणवरे यांनी काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलक वाघमारे रात्री ८ वा. टाॅवरवरुन खाली उतरले आणि प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.
आपले सरकार सेवा केंद्रांच्या दि.४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंजुरी देण्यात आलेल्या निर्णयामध्ये विसंगती असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे संतोष वाघमारे यांनी केली होती. दि.१४ आॅगस्ट पर्यंत न्याय न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी दि.१५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत किंवा जिल्ह्यातील कोणत्याही मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा सीएससी केंद्र चालक संतोष शंकर वाघमारे दिला होता. त्यामुळे कुर्डुवाडी पोलीसांनी शहरातील सर्व टाॅवरचा परीसराची पाहाणी केली मात्र पोलिसांना चकवा देत वाघमारे यांनी कुर्डुवाडी येथील गीताबाईचा मळा येथील मोबाइल टाॅवरवर सुमारे २०० फुट उंचीवर चढून दु.३.३० वा सुमारास आपले आंदोलन सुरु केले. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र महसूल प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार हे अवघ्या ५ मिनिटे अंतरावर असलेल्या पंचायत समिती कार्यालयातून सुमारे १ तासाने घटनास्थळी आले. त्यावेळी त्यांनी ओरडून आंदोलकाला खाली या आपण चर्चा करु असे सांगितले आंदोलकाने लेखी आश्वासनाशिवाय खाली येण्यास नकार दिला. मोबाइलवर बोला म्हणताच आंदोलकाने वरुनच सांगितले की तहसीलदार साहेब आधी तुम्ही माझा मोबाइल नंबर ब्लॅक लिस्टमधून काढा तरच फोन लागेल. त्यानंतर तहसीलदार विनोद रणवरे यांनी आंदोलक वाघमारे यांचा ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला नंबर काढला व चर्चा केली. पण लेखी आश्वासनाशिवाय त्याने खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर प्रांताधिकारी प्रियंका अंबेकर यांनीही फोनवरून आंदोलकाशी चर्चा केली. स्वतः प्रांताधिकारी ,तहसीलदार आणि आंदोलक दोन दिवसांनी उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत मिटींग घेऊन यावर मार्ग काढू असे सांगितले. मात्र वाघमारे लेखी आश्वासनाशिवाय खाली उतरण्यास तयार नव्हते. तब्बल ५ तास हे थरार नाट्य सुरु होते. अखेर करमाळा माढाचे आ.संजयमामा शिंदे,प्रांताधिकारी प्रियंका अंबेकर, तहसीलदार विनोद रणवरे यांनी काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे व आबासाहेब खारे,संदीप खारे,निवृत्ती गोरे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्ती नंतर आंदोलक संतोष वाघमारे रात्री ८ वा. टाॅवरवरुन खाली उतरले आणि प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.