Solapur : मुंबई-सोलापूर विमानसेवेचे मुख्यमंत्री असणार पहिले प्रवासी ; आमदार देवेंद्र कोठे यांची माहिती
१५ ऑक्टोबरला सुरू होणार मुंबई-सोलापूर विमानसेवा
सोलापूर : मुंबई-सोलापूर विमानसेवा येत्या १५ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. या विमानसेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले प्रवासी राहणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.
सोलापूर-गोवा विमानसेवा १० जूनपासून सुरू झाली होती. त्यानंतर आता सोलापूरहून मुंबईसाठी विमानसेवा येत्या १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. मुंबईसाठी विमानसेवा सुरू व्हावी, अशी सोलापूरकरांची अनेक गत वर्षांपासून मागणी होती.
बहुप्रतिक्षित अशा या हवाई प्रवासाची स्वप्नपूर्ती येत्या १५ ऑक्टोबरपासून होणार आहे. अवघ्या चार हजार रुपयांत प्रवास होणार आहे. स्टार एअर या संजय घोडावत ग्रुपच्या विमान कंपनीकडून ही विमान सेवा दिली जाणार आहे.
बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावरून या सेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे ते या सेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुंबईहून विमानाने सोलापूरला येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले. सोलापूर हे स्टार एअरच्या नेटवर्कमधील ३१ वे स्थानक ठरणार असून या सेवेमुळे प्रादेशिक विकासाला नवी चालना मिळेल, अशी आशा आहे.
असे आहे फ्लाइटचे वेळापत्रक
फ्लाइट ए५ ३३३: मुंबईहून दुपारी १२:५० ला सुटणार, सोलापूरला २:१० ला पोहोचणार. फ्लाइट ए५ ३३४ : सोलापूरहून २:४० ला सुटणार, मुंबईला ३:४५ ला पोहोचणार आहे. प्रारंभीचे भाडे सर्व करांसह फक्त ३ हजार ९९९ रुपये इतके ठेवण्यात आले आहे. आठवड्यातून चार वेळा मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार प्रवाशांना या नव्या मार्गाचा लाभ घेता येणार आहे.
.