Solapur News : सोलापूरकरांना घेता येणार विठ्ठल अन् बालाजीचे दर्शन
सोलापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी रेल्वेची मोठी सुविधा
सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी आणि भगवान वेंकटेश बालाजी यांच्या भक्तांसाठी रेल्वेकडून मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने पंढरपूर-तिरुपती-पंढरपूर दरम्यान साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस सुरू केली असून, या गाडीला बार्शी टाऊन व धाराशिव (उस्मानाबाद) येथे थांबे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील हजारो भाविकांना सावळ्या विठ्ठलाचे अन् भगवान तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे.
तिरुपतीहून निघणारी गाडी क्रमांक ०७०१२ दर शनिवारी सायंकाळी ४.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५० वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे. तर पंढरपूरहून निघणारी गाडी क्रमांक ०७०३२ दर रविवारी रात्री ८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १०.३० वाजता तिरुपतीला पोहोचेल. या प्रवासात बार्शी येथे साधारण सायंकाळी ५.०० वाजता (तिरुपती-पंढरपूर) तर रात्री ९.३० वाजता (पंढरपूर-तिरुपती) गाडी थांबणार आहे.
सुरुवातीला या विशेष गाडीला बार्शी व धाराशिव थांबे देण्यात आले नव्हते. याबाबत रेल्वे प्रवासी सेलने सातत्याने पाठपुरावा करून रेल्वे प्रशासनाकडे निवेदने सादर केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत दोन्ही महत्वाचे थांबे मंजूर केले. "बार्शी लाईट रेल्वेची देवाची गाडी" ही जुनी ओळख या तिरुपती-पंढरपूर एक्स्प्रेसमुळे पुन्हा एकदा सार्थ ठरल्याची भावना रेल्वे प्रवासी सेलचे शैलेश बखारिया यांनी व्यक्त केली.
या विशेष गाडीमुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणारे तसेच तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक, वारकरी, विद्यार्थी व सामान्य प्रवासी यांना मोठा फायदा होणार आहे. रविवारी येणाऱ्या पंढरपूर-तिरुपती एक्स्प्रेसचे बार्शी रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी सेलच्या वतीने स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती कनिष्क बोकेफोडे व अजित काळेगोरे यांनी दिली. एकूणच, विठ्ठल-वेंकटेश भक्तांच्या सोयीसाठी सुरू झालेली ही साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस हा श्रद्धा आणि सेवाभावाचा संगम ठरत असून, सोलापूर जिल्हा व परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.