Solapur Weather | कडाक्याच्या थंडीने गारठले सोलापूरकर
सोलापूरमध्ये दिवसागणिक वाढती थंडी
सोलापूर : यंदा सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर आता यंदाच्या हिवाळ्यात दिवसागणिक थंडीत बाढ होत असल्याने वाढत्या थंडीने सोलापूरकर गारठले जात आहेत. मंगळवार, ९ डिसेंबर रोजी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी १२.४ अंश तापमानाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.
यंदा सोलापूरकरांना मे महिन्यापासूनच पावसाळा अनुभवयास आला. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने सोलापूरकरांना चांगलाच दम आणला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून कडाक्याच्या थंडीस सुरुवात झाली. १८ नोव्हेंबर रोजी सर्वात कमी निच्चांकी १३.९ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
यंदा सायंकाळी सहा वाजल्यापासूनच थंडी सोलापूरकरांना जाणवत आहे. रात्री आठनंतर तर कडाक्याच्या थंडीने बाहेर पडणेही मुश्किल झाले असल्याने आठनंतर शहरातील सर्व रस्त्यावर वाहतूक तुरळक दिसून येत आहे. महत्वाच्या कामासाठीच रात्री आठनंतर बाहेर पडण्यास सोलापूरकर पसंती देत आहेत. आठ नंतर अनेक दुकानांचे शटरही ओढले जात असल्याचे दिसून येत आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे यंदा सोलापूरचे मॉर्निंग बॉकही सूर्योदयानंतर सातच्या पुढे होत आहे. तर चाकरमान्यांची सकाळी देखील आठ व नऊ नंतरच होत आहे. सकाळच्या सत्रात शाळा असलेल्या मुलांची व पालकांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. थंडीपासून संरक्षण करणारी वस्त्रे परिधान करुनच मुले शाळेसाठी जात असल्याचे शहरात चित्र दिसून येत आहे.