Karad News : कराडमध्ये 26 ते 30 डिसेंबरला भव्य कृषी प्रदर्शन होणार
शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रदर्शनी कराडमध्ये
सातारा : कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, यादृष्टीने कराड येथील कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करावे, या प्रदर्शनाला आवश्यकते सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
कराड येथील कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. या संबंधी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
संशोधन, उत्पादन, ब्रेण्डिंग, विक्री या सर्व बाबतीत आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञान शेतक्रयांपर्यंत पोहोचावे या हेतूने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते, असे सांगून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, या प्रदर्शनात अधिकाधिक शेतक्रयांनी सहभागी व्हावे यासाठी व्यापक जनजागृती करावी. प्रदर्शनामध्ये सेंद्रीय कृषी मालाचे जास्तीत जास्त स्टॉल उभे करावेत.
कमी खर्चात जास्तीचे पीक उत्पादन कसे घेता येईल याबरोबर अत्याधुनिक शेती अवजारांची माहिती देणारे स्टॉल यांची उभारणी करावी. कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी पिण्याची पाण्याची, प्रदर्शनाच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची तसेच तेथील स्वच्छतेची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.