Solapur News : पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य कीटचे वाटप !
शेतकरी वर्गाचे तसेच गावांमधील शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
सोलापूर: सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन, पेन्सिल, कंपास असे विविध साहित्याचे एकूण ४०० कीट्स तयार केले. हे कीट अपर जिल्हाधिकारी (मदत कक्ष) मोनिका सिंह यांच्याकडे गुरुवारी औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) अंजली मरोड, तहसीलदार (सर्वसाधारण) श्रीकांत पाटील हे अधिकारी उपस्थित होते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे बाधित झाली. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्गाचे तसेच गावांमधील शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
यात पूरग्रस्त भागातील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही पाण्यात नष्ट झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महसूल विभागातील कर्मचारी एकत्र आले. सामाजिक भान ठेवत त्यांनी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी म्हणून विविध साहित्याचे ४०० शैक्षणिक साहित्य कीट तयार करण्यात आले.
हे सर्व कीट गुरुवारी अपर जिल्हाधिकारी (मदत कक्ष) मोनिका सिंह यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी महसूल विभागातील शंतनु गायकवाड, अमर भिगे, गजानन गायकवाड, सुभाष मोपडे, गंगाधर हाके, संदीप माने, महालिंग लोढे, निर्मल आगरखेड, विलास रणसुभे, रणजित म्हेत्रे, लक्ष्मीकांत आयगोळे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.