For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : AI चा वापर करून एकाच दिवशी तीन हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

07:56 PM Jul 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
solapur news   ai चा वापर करून एकाच दिवशी तीन हृदय शस्त्रक्रिया यशस्वी
Advertisement

सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

Advertisement

सोलापूर : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह कर्नाटकच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत वैद्यकीय सेवेसाठी विश्वासार्ह आणि लोकप्रिय ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ए आय चा वापर करून एकाच दिवशी हृदयरोगावरील तीन अतिजटिल शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात आल्या.

भैय्या चौक येथे असलेल्या एसीएस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ञ डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. सिद्धांत गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

हृदयरोगावरील शस्त्रक्रियेत अत्यंत जटिल आणि अवघड समजल्या जाणाऱ्या आयव्हस, रोटा अब्लेशन, बायफरगेशन एन्जोप्लास्टी, इंट्रावॅस्क्युलर लिथो ट्रिप्सी, अल्ट्रा लो कॉन्ट्रास आदी पद्धतींचा वापर करताना यात ए आय चा वापर करून शस्त्रक्रियेचे निदान केल्यास त्यातील अचूकता वाढते हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे.

याबाबत माहिती देण्यासाठी एसीएस हॉस्पिटलमध्ये सोमवारी आयोजित कार्यशाळेत डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांनी मार्गदर्शन केले. पुणे येथील एका रुग्णाची एक वर्षभरापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती.

यानंतर पुढील सहा महिन्यातच त्यांची रक्तवाहिनी बंद पडली. तसेच अवघ्या तीन महिन्यांपूर्वी एन्जोप्लास्टीही करण्यात आली होती. मात्र तरीही त्या रुग्णाचा त्रास कमी न झाल्यामुळे रुग्ण सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता.

या रुग्णावर तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच सोलापूर आणि धाराशिव मधील प्रत्येकी एक रुग्णाच्याही शस्त्रक्रियेचे निदान ए आय द्वारे करण्यात आले. या दोन्ही रुग्णांच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या ठिकाणी दुभागत होत्या त्या ठिकाणी बायफरगेशन ही अत्याधुनिक पद्धती वापरून दोन्ही रक्तवाहिन्यातील रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला.

या दोन्ही शस्त्रक्रिया प्रत्येकी दीड तास चालल्या. या तीनही रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठीचे निदान एआयच्या मदतीने करून डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. सिद्धांत गांधी यांनी या अतिशय जटिल शस्त्रक्रिया केल्या.

उपचारानंतर गुरुवारी या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुणे, धाराशिव आणि सोलापुरातील रुग्णांवर जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथ दिल्याबद्दल डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांचा डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. दीपक गायकवाड यांनी सन्मान केला.

Advertisement
Tags :

.