पणजी श्री मारुतीराय गडावरील माती खचली
वार्ताहर/ पणजी
पणजी-मळा येथील श्री मारुतीराय संस्थानच्या पायऱ्या जवळील डोंगरभाग खचत असून त्याची माती हळूहळू झाडाझुडपातून खाली कोसळत आहे. सदर डोंगराळ भागाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मळा-झरीजवळून मारुती गडावर ये-जा करण्यासाठी अंदाजे शंभर पायऱ्या व त्याच्या आजूबाजूची जागा सुशोभित करण्यात आली होती. श्री मारुतीराय जत्रोत्सवात हजारो भाविक गडावर जाण्यासाठी या पायऱ्यांचा उपयोग करतात. या पायऱ्यांच्या बाजूला डोंगरमाथ्यावर झाडेझुडपे आहेत. गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती खचू लागली असून माती पायऱ्यांवर येऊन पडली आहे.
मळा-झरीजवळील रस्त्यावरुन जाताना आल्तिनो भाग येतो. अनेक अवजड वाहने याच रस्त्यावरुन आल्तिनो तसेच मळा परिसरात येतात. त्याचाही फटका डोंगराला बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात यावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.