महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समाजकार्यातील अध्वर्यू रामकृष्ण नायक यांचे निधन

12:21 PM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगावात झाले अंत्यसंस्कार : समाजातील मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

मडगाव : गोवा हिंदू असोसिएशन व स्नेहमंदिर या संस्थांचे संस्थापक आणि नाट्या चळवळ आणि समाजकार्यातील अध्वर्यू रामकृष्ण केशव नायक (96 वर्षे) यांचे काल रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. सायंकाळी मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते. मुंबईच्या गोवा हिंदू असोसिएशन, गोमंत विद्या निकेतन, गोवा मराठी विज्ञान परिषद, समाजसेवा संघ, स्नेह मंदिर (बांदिवडे-फोंडा) अशा अनेक संस्थांशी त्यांचे जवळचे संबंध होते. ‘गोवा हिदू असोशिएशन’ या संस्थेचा कलाविभाग त्यांनी इतरांच्या साहाय्याने स्थापन केला. स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिकांची खैरात झाल्यानंतर कलाविभागाला व्यावसायिक रूप दिले. मराठी रंगभूमीवर अनेक नवे प्रयोग सादर केलेल्या नाटकांमधून केले. आजही स्मरणात रहावी अशा दर्जेदार नाटकांची निर्मिती केली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, संगीत मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘नटसम्राट’, ‘बॅरिस्टर’ आदी नाटके गोवा हिंदू असोसिएशनतर्फे सादर करण्यात आली.

Advertisement

आमटे, कुसुमाग्रजांची प्रेरणा

फोंडा तालुक्यातील बांदिवडे या गावातील एक डोंगरवजा उजाड जमीन त्यांनी स्नेहमंदिरांसाठी निवडली. ज्यांनी त्यावेळी ही जागा बघितली त्या सर्वांनी त्यांना जवळजवळ मूर्खातच काढले होते. परंतु बाबा आमटेंनी माळरानावर फुलवलेली बाग ही त्यांची प्रेरणा होती. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी आदिवासींच्या जंगलात केलेले कार्य हा त्यांचा विश्वास होता. त्या बळावरच त्यांनी या जमिनीवर पहिले पाऊल टाकले ते अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा या निर्धारानेच. आज स्नेहमंदिर ही वास्तू पाहिली, की हा निर्धार किती योग्य होता याची प्रचिती येते. आपल्या व आपल्या सहकाऱ्यांवर अदम्य विश्वास ठेवला की, शिल्प कसे साकारू शकते त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण होय.

स्नेहमंदिरचे संस्थापक

रामकृष्ण नायक हे ‘काका’ या नावाने जास्त परिचित होते. वयोमानामुळे त्यांनी सक्रीय समाजकार्यांतून निवृत्ती घेतली होती. सध्या बांदिवडे-फोंडा येथील स्नेहमंदिरात आश्र्रय घेतला होता. ते स्वत: या स्नेहमंदिरचे संस्थापक होते. मागचा काही काळ त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना फोंडा येथील सावईकर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचार चालू असताना काल दुपारी पावणे तीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

वडिलांकडून घेतला वसा

3 नोव्हेंबर 1928 रोजी रामकृष्ण नायक यांचा जन्म झाला. आपले वडिल केशव नायक यांच्याकडूनच त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला होता. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले होते. त्यांनी लग्नही केले नव्हते. त्यामुळे त्यांचा संबंध ज्या संस्थांकडे आला, त्या संस्थांतील कार्यकर्ते हे त्यांचे एकप्रकारे कुटुंबीय होते. रामकृष्ण नायक यांना 2015-16 मध्ये प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार व वसंत सोमण पुरस्कार प्राप्त झाला होता.

संस्था महान व्यक्तीला मुकली

रामकृष्ण नायक यांच्या निधनावर गोमंत विद्या निकेतन संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी दु:ख व्यक्त केले आहे. गोमंत विद्या निकेतन संस्थेसाठी काकांनी दिलेले योगदान मोलाचे होते. संस्था एका महान व्यक्तीला मुकल्याचे वेर्लेकर यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेत्यांना दु:ख

गोवा हिंदू असोसिएशन आणि स्नेहमंदिराचे संस्थापक रामकृष्ण नायक यांच्या निधनाने दु:ख झाले. समाजकार्य ही त्यांची जीवनशैली होती. ते स्वत: एक संस्था होते. त्यांच्या कुटुंबाप्रती आपल्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

संस्था म्हणूनच जगले : खलप

रामकृष्ण नायक यांनी आपलं संपूर्ण जीवन साहित्य, संगीत, नाट्या यांस समर्पित केलं. गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेचे कार्य त्यांचं जीवन कार्य झालं होतं. व्यक्ती नव्हे तर ते संस्था म्हणूनच जीवनभर कार्यरत राहिले. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, असे माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.

रामकृष्ण नायक व रंगभूमीचं नातं...

‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेचे रामकृष्ण नायक आणि रंगभूमीचं जन्माचं नातं आहे. दोघांना परस्परांपासून वेगळं करताच येणार नाही. त्यांनी तन, मन आणि धनच नव्हे, तर आपलं अवघं आयुष्य अर्पून ‘गोवा हिंदू’ची आजवर नि:स्वार्थी आणि समर्पितभावानं सेवा केली आणि आज वयाच्या पंच्याणवपर्यंतही ते तऊणाईच्या उत्साहानं काम करीत होते. ‘गोवा हिंदू’च्या आजवरच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी एका पैशाचेही मानधन न घेता संस्थेसाठी मानद सेवा दिली. नायक काकांपाशी असलेली उत्तम नाटक हेरण्याची जाण आणि कलावंतांची अचूक पारख करण्याची वृत्ती होती. रामकृष्ण नायकांनीच पं. जितेंद्र अभिषेकींना नाटकाकडे आणले. अभिषेकीबुवांनी आपल्या करिष्म्याने संगीत नाटकांची व्याख्याच बदलून टाकली, हा इतिहास आहे.

काकांनी वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर, जयवंत दळवी या नाटककारांची उत्कृष्ट नाटके आपल्या संस्थेतून केली आणि या नाटककारांशी स्नेहही जपला. दळवींचे ‘बॅरिस्टर’, शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ ही उत्तुंग नाटके ‘धि गोवा हिंदू’ने अत्यंत जबाबदारीने सादर केली. पुढे तऊणांना हाताशी धरत ‘नागमंडल’, ‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’ अशी प्रायोगिक बाजाची नाटके सादर केली. कठोर शिस्त, कामाचा ध्यास, व्यवसायातील पारदर्शकता आणि नाटकातल्या माणसांशी जपलेला अकृत्रिम जिव्हाळा यांमुळे नायक काकांचा संस्थेत एक धाक निर्माण झालाच पण त्यांच्याविषयी थोरांपासून लहानांपर्यंत सर्वांच्या ठायी आपुलकी निर्माण झाली. ऐंशीच्या दशकात नायक काकांनी गोव्यात बांदिवडे येथे संस्थेच्या वतीने ‘स्नेहमंदिर’ नावाचा वृद्धाश्र्रम उभा केला व आयुष्यच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी स्नेहमंदिरातच मुक्कामाला होते. गोमंतकीय रंगभूमीचे तपस्वी साधक नाट्याकर्मी काकांना भावपूर्ण श्र्रद्धजली. त्यांच्या जाण्याने चांगला तपसवी आपण गमावला...

- दामू नाईक

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article