For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समाजसेवेसाठी नि:स्वार्थ सेवा आवश्यक

10:13 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
समाजसेवेसाठी नि स्वार्थ सेवा आवश्यक
Advertisement

पद्मश्री नीलिमा मिश्रा यांचे प्रतिपादन : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठामध्ये महिला दिन साजरा

Advertisement

बेळगाव : समाजसेवेसाठी चांगली आणि नि:स्वार्थ विचारणी असली पाहिजे. संस्था किंवा समाज बांधण्यासाठी मनापासून काम केले पाहिजे. नि:स्वार्थ भावनेने सेवा केली तरच शाश्वत आणि निरोगी समाज घडू शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री आणि रॅमन मॅक्सेस पुरस्कार विजेत्या, ग्रामीण विज्ञान निकेतनच्या संस्थापिका नीलिमा मिश्रा यांनी केले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विद्याशंकर एस. होते. येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या महिला विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्थितीप्रज्ञा सशक्ती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या म्हणाल्या, नि:स्वार्थ भावना ठेवूनच समाजसेवा केली पाहिजे, तरच त्या सेवेला महत्त्व आहे. आजपर्यंत आपण सरकारकडे एक रुपया न मागता समाजसेवेचे व्रत जपले आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, स्वयंरोजगार या मूलभूत सुविधांबाबत जागरुकता करण्याचे काम केले आहे.

महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करत असून एका प्रभावी टप्प्यावर पोहोचलो असल्याचे त्यांनी सांगितले. समाजसेवेची जाणीव सर्वांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरु प्रा. विद्याशंकर एस. म्हणाले, महिला या समाजाच्या आणि प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या खऱ्या शिल्पकार आहेत. संस्कृती, समृध्दी आणि सामर्थ्याचे प्रतिक आहेत. कुटुंबामध्ये महिलांचे पात्र अत्यंत महत्त्वाचे आहे. एकाचवेळी त्या अनेक भूमिका पार पाडतात. आई, पत्नी, शिक्षिका, घरकाम, सतत कार्यरत राहून कुटुंबाला मोठा आधार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आजच्या जगात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले. यावेळी पद्मश्री नीलिमा मिश्रा, आश्रय फौंडेशनच्या संस्थापिका नागरत्ना यांचा सत्कार करण्यात आला. व्हीटीयूचे निबंधक प्रा. बी. ई. रंगास्वामी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. संध्या अणवेकर यांनी अहवाल सादर केला. खजिनदार एम. ए. सपना यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. रश्मी रच्चा यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.