डी.के.हेरेकर ज्वेलर्सच्या वर्धापनदिनी सामाजिक उपक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
खडेबाजार, बेळगाव येथील डी. के. हेरेकर ज्वेलर्सच्या दुसऱ्या शाखेचा पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंगळवारी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 22 येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बबन भोबे उपस्थित होते. या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. हेरेकर ज्वेलर्सच्या सामाजिक उपक्रमाबाबत शिक्षकांनी आभार मानले.
याचबरोबर सैनिकनगर येथील जीवन आधार वृद्धाश्रमाला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांना फराळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी डी. के. हेरेकर ज्वेलर्सचे संचालक दिलीप हेरेकर, अतुल हेरेकर, मंदार मुतगेकर, प्रमोद हेरेकर, मंजुनाथ, गुरुदत्त यांसह इतर उपस्थित होते. वृद्धाश्रमाचे संचालक कार्व्हालो यांनी डी. के. हेरेकर ज्वेलर्सचे आभार मानले.