गाढविणीच्या दूधाने निर्मित साबण
दुबईतील लोकांकडून होतेय मोठ्या प्रमाणात खरेदी
दुबईत लोक गाढविणीच्या दूधाने निर्मित साबण मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. युएईसमवेत आखाती देश आणि जॉर्डन तसेच इजिप्तमध्येही याची मागणी वाढली आहे. अटन डंकी सोप नावाची कंपनी अम्मानपासून 35 किलोमीटर अंतरावरील मदाबा येथे 100 टक्के नैसर्गिक साबण तयार करत आहे. या कंपनीच्या फार्ममध्ये गाढवं पाळण्यात आली आहेत. जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये कंपनीची एक छोटासा वर्कशॉप आहे. जॉर्डनमध्ये देखील या साबणाला मोठी मागणी आहे.
अशाप्रकारे दुबईत देखील गाढविणीच्या दूधाने निर्मित वेगवेगळ्या ब्रँडचे साबण विकले जातात. प्रारंभी हा साबण जॉर्डनमध्ये लाँच झाला होता, तेव्हा लोकांनी याची थट्टा केली होती. मग याचे फायदे समोर आल्यावर याची मागणी वाढू लागली. गाढविणीच्या दूधात खनिजे आणि प्रोटीनचे भरपूर प्रमाण असते. याचमुळे हा साबण त्वचेला नरमी प्रदान करण्यास मदत करतो. यात मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट देखील असतात. हे घटक त्वचेला ऊन आणि वाढत्या वयाच्या प्रभावांपासून वाचवतात.
गाढविणीच्या दूधाचे वैशिष्ट्या
गाढविणीचे दूध त्वचेच्या पेशींना पुन्हा जिवंत करणे, वाढत्या वयाच्या प्रभावांना कमी करणे आणि एक्झिमा यासारख्या त्वचा रोगांना बरे करण्यास मदत करत असल्याचे एका संशोधनातून कळल्याचे पर्यावरण कार्यकर्ते अल जुबी यांनी सांगितले. गाढविणीच्या दूधाचा साबण त्वचेच्या नाजुक स्तराला संतुलित करणे, सुरकुत्यांसोबत डाग आणि मुऊमांचे प्रभाव दूर करण्यास योगदान देतो.
साबणाची किंमत
गाढविणीच्या दूधात मध, बदामाचे तेल, खोबऱ्याचे तेल मिसळून साबण तयार केला जातो. गाढविणीच्या दूधापासून निर्मित साबणाची किंमत कमी नाही. अनेक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर या साबणाची किंमत 25 दिनारपासून 99 दिनार म्हणजेच 600 ते 2500 रुपयांपर्यंत असते. गाढविणीच्या दूधात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी1, बी2, सी आणि ई, उच्चस्तराचे मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक आणि सोडियम असते, असे आहार तज्ञांचे सांगणे आहे.
सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर
गाढविणीच्या दूधाचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर करण्याची परंपरा राहिली आहे. इजिप्तची राणी क्लियोपेट्रा स्वत:च्या सौंदर्याला कायम राखण्यासाठी गाढविणीच्या दूधाने स्नान करत होती, असे बोलले जाते.