...म्हणून पाळीव प्राण्यांच्या नावावर संपत्ती
आजारपणात मुले न आल्याने वृद्ध महिलेचा निर्णय
जेव्हा मुले लहान असतान, तेव्हा आईवडिल त्यांची खूप सेवा करतात, प्रेमाचा वर्षाव करतात, त्यांची देखभाल करतात, परंतु जेव्हा आईवडिल वृद्ध होतात, तेव्हा मुले स्वत:च्या जबाबदारीपासून तोंड फिरवितात. परंतु आईवडिल कुठल्याही स्थितीत त्यांना माफ करतात. पण अशा मुलांना धडा शिकविणेही आवश्यक आहे. चीनमधील एका महिलेने असेच केले आहे. स्वत:ची मुले देखभाल करत नसल्याचे पाहून या महिलेने स्वत:चे मृत्यूपत्रच बदलले आणि स्वत:च्या पाळीव प्राण्यांच्या नावावर संपत्ती केली आहे.
चीनच्या शांघाय येथे राहणाऱ्या लियु नावाच्या महिलेने स्वत:ची 23 कोटी रुपयांची संपत्ती पाळीव श्वान आणि मांजरांच्या नावावर केली आहे. तिने स्वत:च्या मुलांच्या नावावर काहीच ठेवले नाही. महिलेने काही वर्षांपूर्वी एक मृत्यूपत्र केले होते. ज्यात तिने स्वत:च्या 3 मुलांच्या नावावर रुपये आणि संपत्ती केली होती. परंतु चालू वर्षात तिचे मन बदलले आणि तिने श्वान आणि मांजरांच्या नावावर संपत्ती केली आहे.
जेव्हा मी आजारी हेत, तेव्हा मुले मला भेटायला देखील आली नाहीत. तसेच माझी देखभालही त्यांनी केली नाही. जेव्हा मी मरेन, तेव्हा माझी संपत्ती पाळीव प्राण्यांच्या देखभालीकरता वापरण्यात यावी. एका स्थानिक प्राण्यांच्या क्लिनिकला संपत्तीच्या देखरेखीसाठी नियुक्त केल्याचे लियु यांनी सांगितले आहे.
सोशल मीडियावर चर्चा
लियु स्वत:ची सर्व संपत्ती पाळीव प्राण्यांच्या नावावर करू इच्छित होत्या. परंतु चीनमध्ये अशाप्रकारचा कायदा नाही, यामुळे त्यांना संपत्तीचा वारस ठरणारा आणि प्राण्यांची देखभाल करणारा व्यक्ती नियुक्त करावा लागला आहे. प्राण्यांची देखभाल करण्यास क्लिनिकला मदत करणाऱ्या व्यक्तीची निवड करण्याचा सल्ला लोकांनी तिला दिला होता. तसेच अधिकाऱ्यांनी महिलेला तिच्या मुलांचे वर्तन बदलले तर ती स्वत:ची संपत्ती पुन्हा त्यांच्या नावावर करू शकते असा सल्ला दिला आहे. लियुच्या या निर्णयाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.