... तर तीच रवींना खरी श्रद्धांजली!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार : रवी नाईक यांना कला अकादमीत सरकारतर्फे श्रद्धांजली
पणजी : ‘जे का रंजले, गांजले त्यासी म्हणे जो आपुले ...’ ह्या अभंगाप्रमाणे रवी नाईक यांनी सामान्य माणसांसाठी काम केले. राज्यातील कूळ-मुंडकारांना न्याय मिळवून देण्याचे काम रवी नाईक यांनी केल्यामुळे आता या कुळ-मुंडकार संबंधित जे विषय असतील ते मार्गी लावण्याचे काम गोवा सरकारचे आहे. गोवा सरकारने रवी नाईक यांच्या स्वप्नातील कार्य तडीस नेले, तरच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे महाराष्ट्र्ाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकनेते रवी नाईक यांचे मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी निधन झाल्यानंतर काल रविवारी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कला अकादमी येथे सरकारतर्फे आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, सभापती गणेश गावकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप, माजी खासदार नरेंद्र सावईकर, कुंडई तपोभूमीचे पीठाधीश श्री ब्रह्मेशानंदाचार्य, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, उद्योगपती अवधूत तिंबलो तसेच सरकारातील इतर मंत्री, आमदार उपस्थित होते.
सर्वांना एकत्रित आणण्याचे कार्य : सावंत
केवळ बहुजन समाजाचे कैवारी म्हणून काहीजण रवी नाईक यांचा गौरव करतात. परंतु रवी नाईक यांनी त्याही पलिकडे जात राज्यातील सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. रवी नाईक यांनी कुळ-मुंडकार असुदे वा कृषी क्षेत्रात त्यांनी लोकांच्या हितासाठी खूप मोठे योगदान दिले. शिक्षणक्षेत्रातही त्यांनी अतुलनीय असे काम केले. त्यांचे हे कार्य सदोदित स्मरणात राहील. रवी नाईक हे रिकाम्या वेळेत आपले केवळ अनुभव कथन करीत नव्हते, तर सरकारी निर्णयावर अनेकदा वाट दाखवत होते. मुंडकार यासारख्या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी अनेकदा मार्गदर्शनही केले आहे. मी त्यांना कायम ‘पात्रांव’ असे म्हणायचो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांच्या कार्याचा व आठवणींना उजाळा देताना सांगितले.
तपोभूमीचे स्वप्न नाईक यांच्यामुळेच पूर्ण
तपोभूमीचे पीठाधीश श्री ब्रह्मेशानंदाचार्य यांनी सांगितले, रवी नाईक यांच्यामुळे तपोभूमीचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांनी श्री ब्रह्मानंद स्वामी यांना दिलेला शब्द मनापासून पाळला. ते तत्त्वांना आणि शब्दाला जागणारे नेतृत्व होते. ते फारसे देव देव करीत नव्हते. तरीही जे देवाला मानतात, पूजतात त्यांच्यासाठीही रवी नाईक यांनी मोठे काम केले. त्यामुळे आज ते धार्मिक कार्याबाबतही आदरणीय ठरलेले आहेत. रवी नाईक यांचा अस्त झाला, असे मला दिसत नाही. त्यांचे काम देवांप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरात पोहचलेले आहे, अशा शब्दांत ब्रह्मेशानंदाचार्य यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाऊसाहेबांनंतर रवी हेच बहुजनांचे कैवारी
भाऊसाहेब बांदोडकर यांच्या निधनानंतर रवी नाईक हेच खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे कैवारी ठरले. कार्यक्रमात किंवा आंदोलनाची दिशा ठरविण्यात माझे नाव पुढे असायचे. परंतु खरे सेनापती हे रवी नाईक हेच असायचे. महाराष्ट्रवाद संपला तरी संस्कृती, भाषेच्या आधारे गोमंतक व महाराष्ट्र यांचे मनोमीलन होणे, सौख्य राहणे याबाबतही रवी आणि मी नेहमीच विचार करीत असत. भाऊसाहेबांनंतर कणखर नेता कुणी असेल तर ते म्हणजे रवी नाईक हेच होते, अशा शब्दांत माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी सांगितले.
प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवणारा नेता
रवी नाईक यांनी राजकारण करताना लोकांची मनेही जिंकली. त्यांची कार्यशैली ही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी होती. ते खांद्यावर हात ठेवून लोकांना आपलेसे करत. याच आपुलकीने त्यांनी गोव्यासाठी आणि समाजासाठी मोठे योगदान दिले, अशा शब्दांत अवधुत तिंबलो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजकारणात राहूनही सर्वांसाठी प्रेमळ, आदरणीय नेते
गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर, दुसऱ्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यासारख्या नेत्यांच्या पंक्तीत रवी नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कारण नेतृत्व कसे करावे आणि लोकांचे संघटन कसे बांधावे, हे रवी नाईक यांनीच दाखवून दिले. राजकारणात राहूनही प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून लोकांच्या मनात घर करणारे रवी नाईक हे सर्वांसाठी आदरणीय होते, अशा शब्दांत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहिली.