तर मुस्लीमाला बहुपत्नीत्व अधिकार नाही
वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम
पालन पोषण करण्याची क्षमता नसेल, तर मुस्लीम पुरुषाला अनेक पत्नी करण्याचा अधिकार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. इस्लाम धर्मानुसार मुस्लीम पुरुषाला एकाहून अधिक बायका करण्याचा अधिकार आहे. तथापि, तो विनाअट नाही. आपल्या सर्व पत्नींना योग्य रितीने पोसण्याची आणि त्यांच्या आर्थिक आवश्यकता भागविण्याची त्याची क्षमता असेल, तरच तो एकाहून अधिक बायका करु शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विशेषत: जेव्हा एक पत्नी न्यायालयात याचिका सादर करुन त्याच्याकडे पोटगीची मागणी करते, तेव्हा ती पोटगी देणे त्याचे कर्तव्य ठरते. आपल्याला अनेक बायका करण्याचा अधिकार आपल्या धर्माने दिला आहे, असा बचाव तो अशा प्रकरणांमध्ये करु शकत नाही, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.
प्रकरण काय आहे...
केरळच्या पेरिंथलमन्ना येथील एका 39 वर्षांया मुस्लीम महिलेने आपल्या पतीविरोधात पोटगीचे प्रकरण सादर करुन मासिक 10 हजार रुपयांची पोटगी मागितली होती. पती 46 वर्षांचा असून तो अंध आहे आणि त्याची उपजिविका मुख्यत: भीक मागून चालते. मात्र, त्याला अनेक पत्नी आहेत. त्यांच्यापैकी एका पत्नीने त्याच्याविरोधात पोटगीचे प्रकरण न्यायालयात सादर केले होते. कनिष्ठ न्यायालयात त्याच्या पत्नीचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुस्लीम पुरुषाची आर्थिक क्षमता असेल, तरच त्याला एकापेक्षा अधिक महिलांशी विवाह करण्याचा अधिकार आहे. अन्यथा तसा अधिकार मिळू शकत नाही, असे मतप्रदर्शन न्यायालयाने निर्णयात केले आहे.