आतापर्यंत भुतरामहट्टीत तीन वन्यप्राण्यांचा मृत्यू
दोन सिंह-एका वाघाचा समावेश : प्राण्यांच्या सुरक्षितेबाबत चिंता
बेळगाव : भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील एका सिहिंणीचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत प्राणीसंग्रहालयातील तीन वन्यप्राणी दगावले आहेत. त्यामध्ये दोन सिंह आणि एका वाघाचा समावेश आहे. प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने हे प्राणी वयस्कर होऊन दगावले असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, संग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही वन्यप्राणीप्रेमींतून उपस्थित केला जात आहे. शहरापासून अवघ्या 10-12 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालयात 2019 मध्ये विविध जातीचे वन्यप्राणी दाखल झाले होते. बेंगळूर येथील बेन्नूगुंटल प्राणीसंग्रहालयातील वाघ आणि सिंहही आणण्यात आले होते. नकुल, कृष्ण आणि निरुपमा अशी या सिंहांची नावे होती. यापैकी मादी जातीचे नकुल आणि निरुपमा दगावले आहेत. आता केवळ कृष्ण हा नरजातीचा सिंह शिल्लक राहिला आहे. त्यामुळे संग्रहालयातील सिंहांची गर्जनाही कमी होणार आहे.
2021 मध्ये नकुल तर 6 फेब्रुवारी 2025 मध्ये निरुपमा सिंहिणीचा मृत्यू झाला. तर नोव्हेंबर 2024 मध्ये शौर्य नामक वाघाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संग्रहालयात आता कृष्णा आणि कनिष्का असे दोन वाघ शिल्लक राहिले आहेत. आता पुन्हा नव्याने संग्रहालयात सिंह दाखल होणार का? हाच प्रश्न औत्सुक्याचा आहे. म्हैसूर येथील प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. तब्बल 41 एकर क्षेत्रामध्ये तब्बल 50 कोटींच्या निधीतून विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. वन्यप्राण्यांसाठी होल्डींग रुम आणि कोठडी उभारण्यात आल्या आहेत. या संग्रहालयात वाघ, सिंहांबरोबर बिबटे, अस्वल, तरस, मगर, कोल्हे, हरीण, सांबर, चितळ यासह विविध पक्षीही दाखल झाले आहेत. त्याबरोबर मत्स्यालयही उभारण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांसह विविध शैक्षणिक सहली दाखल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, प्राणीसंग्रहालयातील आतापर्यंत तीन महत्त्वाचे प्राणी दगावले आहेत. त्यामुळे संग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत जनतेतून चिंता व्यक्त केली जात आहे.
वयस्कर असल्याने मृत्यू!
गुरुवारी 15 वर्षीय निरुपमा सिंहिणीचा मृत्यू झाला आहे. सिंह सहसा 15 ते 18 वर्षे जगतात. संग्रहालयात दाखल झालेले सिंह वयस्कर होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नकुल, निरुपमा या मादी तर शौर्य नावाचा वाघ दगावला आहे. नवीन सिंह आणि वाघ आणण्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालयाकडे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
- पवन कालिंग (आरएफओ, भुतरामहट्टी)