सापाची ‘मावशी’
आपल्याला ‘वाघाची मावशी’ हा वाक्प्रचार माहीत आहे. मांजरीला वाघाची मावशी असेही म्हणतात. अशा प्रकारची एक गोष्ट लहानपणी आपण ऐकलेली असते. त्यामुळे मांजरी ही वाघाची मावशीच असते अशी आपली ठाम समजूत निदान लहानपणी तरी झालेली असते. ही कथा साधारण अशी आहे, की एका वाघीणीने तिची पिल्ले शिक्षणासाठी मांजरीकडे पाठविली. मांजरीने त्यांना शिकार करणे, स्वत:चे रक्षण करणे इत्यादी सर्व कौशल्ये शिकविली. पण झाडावर चढायला शिकवले नाही. पुढे वाघीणीची पिले मोठी झाली आणि ती मांजरीलाच आपली शत्रू मानू लागली. त्यांच्यापैकी एकाने मांजरीवर हल्ला केला, त्यावेळी मांजरीने उंच झाडावर चढून आपला जीव वाचविला. वाघाला झाडावर चढता येत नसल्याने तो काही करु शकला नाही. म्हणजेच, मांजरीने आपण वाघापेक्षा चतुर आहोत हे सिद्ध केले. तेव्हापासून मांजरीला वाघाची मावशी, म्हणण्याचा प्रघात पडला.
अशाच प्रकारे एक सापाची मावशीही अस्तित्वात आहे. ‘सापसुरळी’ नावाच्या एका सरपटणाऱ्या प्रजातीला सापाची मावशी असे म्हणतात. ही प्रजाती धोकायदायक किंवा विषारी नसते. तिचे वैशिष्ट्या असे की ती नराशिवायही पिलाना जन्म देऊ शकते. कोणत्याही अन्य प्रजातीच्या सापाने तिच्यावर हल्ला केल्यास ती अन्य सापांना माहीत नसलेल्या मार्गांनी स्वत:चे संरक्षण करु शकतो. या प्रजातीवर अमेरिका आणि अन्य देशात संशोधन सुरु आहे. ती नराशिवाय पिलाना जन्म कशी देऊ शकते, याचा रहस्यभेद झाला आहे. जेव्हा तिचा प्रथम नर सापसुरळीशी समागम होतो, तेव्हा ती त्याचे शुक्राणू स्वत:च्या शरिरात साठवून ठेवते. त्यामुळे नंतर तिला कधीही समगमासाठी आणि पुनरुत्पादन करण्यासाठी नराची आवश्यकता लागत नाही. अशा प्रकारे ही प्रजाती सापांसारखीच सरीसृप वर्गातली असली तरी ती काही भिन्न वैशिष्ट्यांनी आणि कौशल्यांनी युक्त असल्याने या प्रजातीला सापाची मावशी म्हणण्याचा प्रघात आहे.