गुळातून गुटख्याची तस्करी, 34 लाखांचा मुद्देमाल जप्त; कोल्हापूर - मलकापूर मार्गावर कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
गुळाच्या रव्यातून गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. त्यांच्याकडून 13 लाखांचा गुटखा, 100 क्विंटल गुळ, एक आयशर टेम्पो असा सुमारे 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय कृष्णा खपले (वय 48 रा. भैरी रोड, गडहिंग्लज), शरद केशव लिंगायत (वय 42 रा. केळे, माजगांव, रत्नागिरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. शुक्रवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर - मलकापूर मार्गावर महाराष्ट्रात बंदी असणाऱ्या गुटख्याची तस्करी करुन ती रत्नागिरीकडे नेण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती. गुरुवारी दुपारी बांबवडे नजीक पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह पथकाने सापळा रचला होता. रत्नागिरीकडे जाणारा एक संशयास्पद टेप्मो या पथकाने थांबविला. टेम्पोची झडती घेतली असता, गुळाच्या रव्यांमध्ये गुटख्याची पोती लपविल्याचे आढळून आले. यामुळे चालक संजय खपले व शरद लिंगायत या दोघांना ताब्यात घेवून शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर आयशर टेम्पो, पानमसाला, गुटख्याची पाकिटे, 100 क्विंटल गुळ जप्त केला.
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस अंमलदार संजय पडवळ, युवराज पाटील, दिपक घोरपडे, सोमराज पाटील, अमित मर्दाने, संतोष पाटील, यशवंत कुंभार यांनी ही कारवाई केली.